काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड
शहरातील संरक्षण विभागाशी संबंधित वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या भेटीनंतर त्यांच्या सूचनेनुसार खडकी हेडक्वार्टर्स येथे आज महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत रेड झोन निर्बंध, कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा आणि पिंपळे सौदागर परिसरातील अग्निशमन केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
महापौर रवि लांडगे यांनी कर्नल रवि कुमार गरगोत्रा यांच्यासोबत शहराच्या विकासाशी संबंधित विविध प्रश्नांवर चर्चा केली. विशेषतः मॅगझिन चौक येथील अम्युनेशन डेपो स्थलांतरित झाल्यामुळे त्या परिसरातील रेड झोन निर्बंध पूर्णतः हटविण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्याबाबत सकारात्मक भूमिका मांडण्यात आली.
रेड झोनचा प्रश्न हा शहरातील हजारो नागरिकांच्या मालमत्ता, बांधकामे आणि भविष्यातील विकासाशी थेट संबंधित आहे. त्यामुळे निर्बंध शिथिल किंवा हटविण्याच्या दृष्टीने होणारी कार्यवाही नागरिकांसाठी महत्त्वाची ठरणार आहे.
याशिवाय शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन कचरा व्यवस्थापनाच्या पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी हॉटेल कलासागरजवळील संरक्षण विभागाची जागा कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. पिंपळे सौदागर व परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर नवीन अग्निशमन केंद्र उभारण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.
महापौर रवि लांडगे म्हणाले, “रेड झोनसह संरक्षण विभागाशी संबंधित अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर आणि शहराच्या विकासावर होत आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या विषयांची सकारात्मक दखल घेतल्यामुळे पुढील स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. मॅगझिन चौक येथील अम्युनेशन डेपो स्थलांतरित झाल्याने रेड झोन निर्बंध हटविण्याच्या दृष्टीने सकारात्मक कार्यवाही होईल, असा विश्वास आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि अग्निशमन केंद्रासाठी जागा उपलब्ध करून घेण्यासाठीही सातत्याने पाठपुरावा केला जाईल.”
केंद्र शासन, संरक्षण मंत्रालय, संरक्षण विभाग आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्यात समन्वय साधून हे प्रश्न निर्णायक टप्प्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. चर्चेपुरते विषय मर्यादित न ठेवता त्यावर ठोस निर्णय होऊन नागरिकांना प्रत्यक्ष दिलासा मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू राहणार आहे.
बैठकीस नगररचना उपसंचालक ललित खोब्रागडे, सहाय्यक संचालक संदेश खडतरे, खडकी हेडक्वार्टर्सचे जनसंपर्क अधिकारी किरण पवार तसेच संरक्षण विभाग आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.







