काशिनाथ शिंदे : भिगवन
स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेपासून मुक्ती नव्हे, तर माणसामाणसांतील भेद, दुरावा आणि विसंवाद दूर करून एकमेकांशी माणुसकीने वागण्याचे स्वातंत्र्यही होय, असा अंतर्मुख करणारा संदेश इंदापूर तालुक्यातील लामजेवाडी जिल्हा परिषद शाळेच्या स्वातंत्र्य दिन कार्यक्रमातून देण्यात आला. अंगणवाडीतील चिमुकल्यांनी सादर केलेल्या ‘माणसाने माणसाशी माणसासम वागावे, हीच आमची प्रार्थना’ या गीताने उपस्थित ग्रामस्थांच्या मनाला स्पर्श केला.
लामजेवाडी जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बबनराव बर्गे होते. सामाजिक कार्यकर्ते गोपाळ धुमाळ यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी पोलीस पाटील दिलीप पवार, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ शेलार, नामदेव सूर्यवंशी, गौतम निगडे, पत्रकार गोविंद बर्गे, माऊली साळुंखे, लक्ष्मी साळुंखे, लक्ष्मी शेलार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनानिमित्त अंगणवाडीपासून इयत्ता चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढली. देशभक्तिपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी कवायती, संगीत कवायत तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते अंगणवाडीतील चिमुकल्यांनी सादर केलेले ‘माणसाने माणसाशी माणसासम वागावे, हीच आमची प्रार्थना’ हे गीत. लहानग्यांच्या निरागस आवाजातून उमटलेल्या या गीताने आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढत चाललेला माणसामाणसांतील दुरावा, विस्कटत चाललेली सामाजिक वीण आणि हरवत चाललेली माणुसकी याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. चिमुकल्यांनी दिलेला हा साधा, पण प्रभावी संदेश उपस्थितांना अंतर्मुख करून गेला.
यानंतर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सहभागी झालेल्या ग्रामस्थांचा तसेच नवसाक्षरता वर्गात यशस्वी झालेल्या ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला. ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. स्वातंत्र्य दिन साजरा करताना माणुसकी, स्वच्छता, शिक्षण आणि सामाजिक एकोपा जपण्याचा संकल्प प्रत्येकाने करावा, असा संदेश यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक सुखदेव वाघमारे यांनी केले.







