काशिनाथ शिंदे : पिंपरी
गणेशोत्सवानिमित्त पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी लक्षात घेता कोकणातील विविध मार्गांवर जादा एसटी बसगाड्या सोडाव्यात, अशी मागणी कोकण खेड युवाशक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आली. याबाबत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी वल्लभनगर एसटी आगाराच्या आगारप्रमुख वैशाली कांबळे यांना निवेदन दिले.
गणेशोत्सवाच्या काळात पुणे, पिंपरी-चिंचवड परिसरातील कोकणवासीय मोठ्या संख्येने आपल्या गावी रवाना होतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी कोकणातील विविध मार्गांवर जादा बसगाड्या उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
तसेच खेडमधील वडगाव मार्गावरील बंद असलेली बससेवा तातडीने सुरू करावी, अशी मागणीही करण्यात आली. चोरवणे मार्गावर प्रवाशांची संख्या वाढत असल्याने या मार्गावरही विशेष जादा बसगाड्या सोडाव्यात, अशी मागणी संस्थेने केली.
या मागण्यांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जादा बसगाड्या सोडण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील, असे आश्वासन आगारप्रमुख वैशाली कांबळे यांनी दिले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष संतोष कदम, सचिव नंदकुमार महाडिक, कार्याध्यक्ष अंकुश चव्हाण, मार्गदर्शक गजानन भाऊ मोरे, उद्योजक ज्ञानेश्वर कदम, माजी अध्यक्ष संदीप साळुंखे, रुपेश मोरे, सुरज उतेकर आदी उपस्थित होते.







