२ लाख ७४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त; सिलिंडर, गॅस भरण्याचे साहित्य आणि टेम्पो ताब्यात
काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड : घरगुती वापराच्या सिलिंडरमधून बेकायदेशीर आणि अत्यंत धोकादायक पद्धतीने गॅस चोरी करून तो काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या दोघांवर दिघी पोलिसांनी धडक कारवाई केली. दाट लोकवस्तीमध्ये सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून सुरू असलेल्या या अवैध गॅस भरण्याच्या धंद्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला.
या कारवाईत पोलिसांनी २ लाख ७४ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये घरगुती गॅस सिलिंडर, गॅस ट्रान्सफर व भरण्याचे साहित्य तसेच एक टेम्पोचा समावेश आहे.
आरोपींकडून अत्यंत धोकादायक पद्धतीने गॅसची चोरी व ट्रान्सफर केली जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या जीवितास तसेच मालमत्तेला मोठा धोका निर्माण झाला होता.
दिघी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या अवैध गॅस रिफिलिंगच्या माध्यमातून आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
दिघी पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात बेकायदा गॅस भरणे आणि काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.







