काशिनाथ शिंदे
छत्रपती संभाजीनगर : तिसगाव येथील खावडा डोंगरावर हृदयद्रावक घटना घडली. डोंगरावर गेलेल्या मुलाला वाचवण्यासाठी धावलेल्या आई-वडिलांसह तिघांचा दरीत कोसळून मृत्यू झाला. या घटनेने देवळाई-सातारा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल मुरलीधर चांदवडे हा खावडा डोंगरावर गेल्याची माहिती त्याच्या आई-वडिलांना मिळाली. त्यानंतर मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे हे सकाळी सुमारे ११ वाजता घटनास्थळी पोहोचले. कुणाल डोंगरावर असल्याचे दिसताच आई-वडिलांनी त्याला खाली येण्यासाठी वारंवार विनवणी केली.
मात्र, कुणाल खाली येत नसल्याने वडील मुरलीधर यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. याचवेळी कुणाल आणि मुरलीधर दोघेही डोंगरावरून खाली कोसळले. त्यानंतर मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात संगीता चांदवडे यांनीही खाली उडी घेतल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तिघांना वाचवण्यासाठी खाली जाळी लावून बचावकार्य करण्यात आले. मात्र, या प्रयत्नांना यश आले नाही. कुणाल मुरलीधर चांदवडे, मुरलीधर चांदवडे आणि संगीता चांदवडे या तिघांचा मृत्यू झाला.
तिघेही देवळाई, सातारा परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. कुणालने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
दरम्यान, खावडा डोंगरावर यापूर्वीही अशा दुर्घटना घडल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे डोंगरावर संरक्षक कठडे, सुरक्षा जाळी आणि अन्य प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने करण्याची मागणी जोर धरत आहे. ‘आणखी किती जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार?’ असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.







