Oplus_131072
काशिनाथ शिंदे.पिंपरी, दि. २० : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयामार्फत नागरिकांच्या तक्रारी, समस्या आणि सूचना थेट पोलीस आयुक्तांसमोर मांडण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या “पोलीस आयुक्तांची भेट” या उपक्रमाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. प्रशासकीय कारणास्तव दर सोमवारी होणारी ही भेट आता दर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नागरिकांना त्यांच्या समस्या, तक्रारी व सूचना थेट पोलीस आयुक्तांसमोर मांडण्याची संधी या उपक्रमातून मिळते. तसेच संबंधित प्रकरणांचा तातडीने आढावा घेऊन आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या जातात.
या भेटीदरम्यान पोलीस आयुक्तांसोबत सहपोलीस आयुक्त, अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतात. त्यामुळे नागरिकांच्या विविध प्रकारच्या तक्रारींवर प्रभावीपणे चर्चा होऊन त्यांचे निराकरण करण्यास मदत होते.
यापूर्वी हा उपक्रम दर सोमवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत होत होता. मात्र आता बदल करण्यात आल्याने सोमवारऐवजी प्रत्येक शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत नागरिकांची प्रत्यक्ष भेट घेण्यात येणार आहे. या बदलाची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
