आंतरराष्ट्रीय शाळा मान्यता परिषदे’कडून राष्ट्रीय स्तरावर तीन पुरस्कार; पद्माताई भोसले यांच्याकडून अभिनंदन
काशिनाथ शिंदे
पिंपरी, आजचे विद्यार्थी हे भारताच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार आहेत. विद्यार्थ्यांना ज्ञान, मूल्ये, कौशल्ये आणि आत्मविश्वासाने सक्षम करण्यासाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे (पीसीईटी) एस. बी. पाटील पब्लिक स्कूल सातत्याने विद्यार्थी केंद्रित उपक्रम राबवत आहे. या शैक्षणिक कार्याची राष्ट्रीय पातळीवर दखल घेत ‘आंतरराष्ट्रीय शाळा मान्यता परिषद’कडून (इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ स्कूल अॅक्रेडिटेशन) एस. बी. पाटील पब्लिक स्कूलला यंदा तब्बल तीन पुरस्कार मिळणे अभिमानास्पद आहे, असे पीसीईटीच्या उपाध्यक्ष पद्माताई भोसले यांनी सांगितले.
दिल्ली येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात एस. बी. पाटील पब्लिक स्कूलला ‘शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. तसेच शाळेच्या प्राचार्या डॉ. बिंदू सैनी यांना ‘उत्कृष्ट अध्यापन व प्रशासकीय कौशल्य पुरस्कार २०२६’, तर मुख्याध्यापिका शुभांगी कुलकर्णी यांना ‘उत्कृष्ट प्रशासकीय व प्रेरणादायी कौशल्य पुरस्कार २०२६’ देऊन गौरविण्यात आले.
‘१०+२’ शालेय शिक्षण पद्धतीत उत्कृष्टतेला प्रोत्साहन देणे, पारंपरिक मूल्यमापनाच्या पलीकडे जाऊन संस्थात्मक विकास, सहकारी मूल्यमापन, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि सातत्यपूर्ण सुधारणा यांना चालना देणाऱ्या शाळा, मुख्याध्यापक आणि प्रशासकांचा या पुरस्कारांच्या माध्यमातून गौरव करण्यात येतो.
यंदाच्या पुरस्कारांसाठी देशभरातून अंतिम फेरीत ३०० प्रवेशिकांची निवड करण्यात आली होती. त्यामधून एस. बी. पाटील पब्लिक स्कूलला तीन पुरस्कार मिळाल्याने शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेवर आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांवर राष्ट्रीय पातळीवर शिक्कामोर्तब झाले आहे.
उत्कृष्टता, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि उद्देशपूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या शाळेच्या वचनबद्धतेची या पुरस्कारांमुळे पुन्हा एकदा प्रचिती आली आहे, असे पद्माताई भोसले यांनी सांगितले. त्यांनी पुरस्कारप्राप्त डॉ. बिंदू सैनी, शुभांगी कुलकर्णी आणि संपूर्ण शाळा परिवाराचे अभिनंदन केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी पुरस्कारप्राप्तांचे अभिनंदन केले.
चौकट :मानसिक आरोग्यावर डॉ. बिंदू सैनी यांचे मार्गद
‘आजच्या काळातील मानसिक आरोग्याचे वाढते महत्त्व’
दिल्लीतील पुरस्कार वितरण सोहळ्यात एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या प्राचार्या डॉ. बिंदू सैनी यांना देशभरातून आलेल्या पुरस्कारार्थींसमोर ‘आजच्या काळातील मानसिक आरोग्याचे वाढते महत्त्व’ या विषयावर व्याख्यान देण्याचा बहुमान मिळाला.
सोशल मीडियाचा वाढता प्रभाव, त्यामुळे तरुणांवर निर्माण होणारा मानसिक ताण आणि पालकांच्या वाढत्या अपेक्षांचा विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम यावर डॉ. सैनी यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या मानसिक आरोग्याकडेही संवेदनशीलतेने पाहण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.







