काशिनाथ शिंदे
पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरात ड्युटीवर तैनात असलेल्या पोलीस शिपाई अक्षय बांबल यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गांजा सेवन करणाऱ्या तरुणांना हटकल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे स्थानक परिसरात काही तरुण गांजा सेवन करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस शिपाई अक्षय बांबल यांनी त्यांना हटकल्याचे सांगितले जाते. यावेळी संबंधित तरुणांसोबत त्यांचा वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संशयितांनी बांबल यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याची माहिती आहे.
या हल्ल्यात अक्षय बांबल गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांवरच अशा प्रकारे हल्ला करण्याचे धाडस करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
ड्युटीवर असलेल्या पोलिसांवर हल्ला होणे ही अत्यंत गंभीर बाब असून, कायदा-सुव्यवस्था आणि पोलिसांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणातील संशयितांविरोधात कठोर कारवाई होणे अपेक्षित असून, घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.







