अखिल नेताजीनगर दहीहंडी उत्सव समितीचा माणुसकीचा आदर्श; उत्सवाचा खर्च सामाजिक उपक्रमासाठी
काशिनाथ शिंदे
पिंपळे गुरव, उत्सवाची परंपरा जपत सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत पिंपळे गुरव येथील अखिल नेताजीनगर दहीहंडी उत्सव समितीने यंदा दहीहंडी उत्सव साधेपणाने साजरा करून माणुसकीचा आदर्श निर्माण केला. जुनी सांगवी येथे लोखंडी कमान अंगावर पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर समितीने उत्सवाचा अनावश्यक खर्च टाळून तो सामाजिक उपक्रमासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला.
जुनी सांगवी येथील दुर्घटनेत महिलेचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली होती. या दुःखद घटनेची संवेदनशीलता लक्षात घेऊन पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याबरोबरच उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा निर्णय समितीने घेतला.
त्यानुसार दहीहंडी उत्सवासाठी होणारा खर्च टाळून पिंपळे गुरव येथील ममता अंध-अनाथ कल्याण केंद्र तसेच दापोडी येथील सरस्वती अनाथ शिक्षण संस्थेतील चिमुकल्यांना अन्नदान करण्यात आले. या उपक्रमातून उत्सवाचा आनंद वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला.
सर्व वर्गणीदार आणि सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाचे रूपांतर विधायक सामाजिक उपक्रमात करण्याचा निर्णय समितीने घेतला. उत्सव म्हणजे केवळ जल्लोष आणि मनोरंजन नसून सामाजिक जाणीव, संवेदनशीलता आणि माणुसकी जपण्याचे प्रभावी माध्यम ठरू शकते, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
अनाथ आणि अंध चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य, त्यांच्या आनंदाचे क्षण आणि त्यांना मिळालेला आपलेपणा हीच यंदाच्या दहीहंडी उत्सवाची खरी कमाई असल्याची भावना समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
सामाजिक बांधिलकी जपत समितीच्या वतीने यापूर्वीही विविध सेवा उपक्रम राबविण्यात आले आहेत. यापुढेही गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांसाठी अशाच प्रकारचे सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला.







