रेकॉर्डवरीलआरोपीलाचोरीच्यावाहनासहपकडले;तीनवाहनचोरीचे गुन्हे उघडकीस
दोन दुचाकींसह १ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त
काशिनाथ शिंदे
पिंपरी, : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पाहिजे, फरारी व तडीपार आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे शाखा युनिट-३ने जबरदस्त कामगिरी करत रेकॉर्डवरील एका आरोपीला चोरीच्या वाहनासह ताब्यात घेतले. आरोपीकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने तीन वाहनचोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याने हे गुन्हे उघडकीस आले आहेत.
जॉर्डन राजेश साळवे (वय २०, रा. घरकुल, चिखली, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी चोरीच्या वाहनासह घरकुल, चिखली परिसरात थांबला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी खात्री करून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने तीन वाहनचोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली.
आरोपीकडून ७५ हजार रुपये किमतीची होंडा अॅक्टिव्हा आणि ५० हजार रुपये किमतीची हिरो स्प्लेंडर, अशा एकूण १ लाख २५ हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या.
या कारवाईमुळे चिखली पोलीस ठाण्यातील दोन आणि दापोडी पोलीस ठाण्यातील एक, असे एकूण तीन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
आरोपीचा यापूर्वीही गुन्हेगारी इतिहास असून त्याच्याविरुद्ध निगडी आणि चिखली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक जावळे, पोलीस अंमलदार सोमनाथ बोऱ्हाडे, अजित रुपनवर, स्वप्निल महाले, तुषार वराडे, बाळासाहेब भांगले आणि दिलीप राठोड यांच्या पथकाने केली.
संतोष कसबे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा युनिट-३, पिंपरी-चिंचवड यांच्या मार्गदर्शनाखाली ही उल्लेखनीय कारवाई करण्यात आली.







