काशिनाथ शिंदे: पिंपरी
विद्यानगर परिसरातील हनुमान मंदिराजवळ रस्त्याच्या कडेला धारदार तलवार आणि कोयता घेऊन फिरणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रेम कृष्णा मोरे (वय १९, रा. ओटास्कीम, निगडी प्राधिकरण) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून तलवार आणि कोयता असा एकूण १ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई ७ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे २.४० वाजता करण्यात आली. मोरे याच्याकडे अंदाजे १ हजार रुपये किमतीची धारदार लोखंडी तलवार आणि ६०० रुपये किमतीचा धारदार लोखंडी कोयता आढळून आला.
पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त यांनी २ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत शस्त्रे, हत्यारे बाळगण्यास मनाई आदेश जारी केला आहे. या आदेशाचे उल्लंघन करून मोरे याने धारदार हत्यारे बाळगल्याचे पोलिसांच्या कारवाईत निष्पन्न झाले.
या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६९७/२०२६ दाखल करण्यात आला आहे. मोरे याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ (२५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणातील रोहन माने (रा. विद्यानगर कमानीजवळ, चिंचवड) आणि रिहान शेख हे दोघे साथीदार अद्याप फरार असून, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. तपासादरम्यान ही हत्यारे त्यांच्याकडून पुरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
फरार दोन्ही संशयितांचा शोध घेण्यासाठी पिंपरी पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.







