उच्च शिक्षण, शिष्यवृत्ती, संशोधन व करिअरच्या संधींबाबत सविस्तर चर्चा
काशिनाथ शिंदे: पिंपरी
पुणे, विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक अनुभव, उच्च शिक्षण व संशोधनाच्या संधी, रोजगार तसेच करिअरविषयक मार्गदर्शन मिळावे, यासाठी परदेशातील विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांशी संवाद आणि सहकार्य वाढविणे गरजेचे आहे. या उद्देशाने अमेरिका, रशिया आणि केनिया येथील शैक्षणिक शिष्टमंडळाने पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) निगडी येथील कार्यालयाला नुकतीच भेट दिली.
या शैक्षणिक दौऱ्यात सहभागी आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींचे पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी स्वागत केले. यावेळी ट्रस्टच्या उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर तसेच कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई आदी उपस्थित होते.
शिष्टमंडळात मोनरो युनिव्हर्सिटी, अमेरिका येथील आग्नेय आशिया ऑपरेशन्सच्या सहाय्यक संचालक आशा अलोशियस, इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, अमेरिका येथील स्टुडंट सक्सेस ॲडव्हायझर रोचेस्टर विंचो चौहाई, कझान इनोव्हेटिव्ह युनिव्हर्सिटी, रशियाच्या आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे डेनिस कीको, सेंट लुईस युनिव्हर्सिटी, अमेरिका येथील युनिव्हर्सिटी रिलेशन्स ऑफिसर अभिनव भारद्वाज, मिडवे युनिव्हर्सिटी, अमेरिका येथील प्रादेशिक प्रतिनिधी रजत कुशवाह, लाइट अकादमी, केनिया येथील शाळा समुपदेशक पॉल, स्टडी मेट्रोचे आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्सचे उपाध्यक्ष अभिनव बजाज, प्रादेशिक संचालक राज कपूर, पंकज चव्हाण आदींचा समावेश होता.
पीसीईटीच्या सेंटर फॉर युरोपियन स्टडीजच्या प्रमुख डॉ. ऐश्वर्या गोपालकृष्णन यांनी पीसीईटीच्या शैक्षणिक उपक्रमांसह संशोधन देवाणघेवाण, संशोधन सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय संस्थात्मक भागीदारीच्या विविध संधींबाबत शिष्टमंडळाला माहिती दिली.
यावेळी अमेरिका, रशिया आणि केनिया येथील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी उपलब्ध अभ्यासक्रम, प्रवेश प्रक्रिया, विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्तीच्या संधी तसेच करिअरच्या विविध पर्यायांबाबत सविस्तर चर्चा झाली. विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर शिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांशी सहकार्य वाढविण्यावरही भर देण्यात आला.
पीसीईटी आणि अमेरिका, रशिया तसेच केनिया येथील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये आगामी काळात शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातील सामंजस्य करार (एमओयू) करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. या माध्यमातून विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षण, संशोधन, शिष्यवृत्ती आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.







