पिस्तूल, दोन मॅग्झिन व दोन जिवंत काडतुसे जप्त; खंडणी विरोधी पथकाची कारवाई
काशिनाथ शिंदे
दिघी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या गुन्हेगारांविरोधात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. या मोहिमेंतर्गत गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने MCOCA प्रकरणातील मागील पाच महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणाऱ्या पाहिजे आरोपीला अटक केली. राहुल रमेश चव्हाण (वय २६, रा. भारतमातानगर, दिघी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल चव्हाण याच्याकडे अवैध शस्त्र असल्याची गोपनीय माहिती खंडणी विरोधी पथकाचे पोलीस हवालदार प्रदीप पोटे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
या पथकाने पठारे मळा, ९० फुटी रस्ता, म्हसोबा देवस्थानासमोरील मोकळ्या जागेत, चऱ्होली बुद्रुक येथे सापळा रचला. पोलिसांना पाहताच संशयित हालचाली करणाऱ्या राहुल चव्हाण याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेण्यात आली.
झडतीदरम्यान त्याच्याकडून एक लोखंडी पिस्तूल, दोन लोखंडी मॅग्झिन आणि दोन जिवंत काडतुसे, असा एकूण सुमारे ५३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६०७/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३(५), भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५), तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीला पुढील कारवाईसाठी दिघी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
MCOCA प्रकरणातही होता पाहिजे आरोपी
दरम्यान, राहुल चव्हाण हा दिघी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात मागील पाच महिन्यांपासून पाहिजे आरोपी होता. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील कलम १०९, ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५), भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५), २७, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५, तसेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) मधील कलम ३(१)(ii), ३(२) आणि ३(४) यांसह विविध कलमांनुसार कारवाई करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) रोहिदास पवार आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.







