काशिनाथ शिंदे
पुणे : चेक न वटल्याच्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावत फिर्यादीला तब्बल ९७ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला. पुणे येथील मे. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा प्रमुख न्यायदंडाधिकारी आनंद एस. मुंढे यांनी २१ सप्टेंबर २०२६ रोजी हा निकाल दिला. या खटल्यात फिर्यादीतर्फे अॅड. विशाल विजयकुमार बर्गे आणि अॅड. युवराज जाधव यांनी केलेला कायदेशीर युक्तिवाद निर्णायक ठरला.
‘युनायटेड मेडिकल सोल्यूशन’ कंपनीतर्फे जयदीप दत्ताराम कुंभार (रा. वारजे, पुणे) यांनी ही खासगी फौजदारी तक्रार दाखल केली होती. आरोपी जगदीश बाजीराव कदम हे ‘स्पंदन मेडिकेअर’चे मालक असून ते नवी सांगवी येथील समर्थनगर परिसरात राहतात.
८८ लाख ५९ हजारांचा चेक वटला नाही
फिर्यादी आणि आरोपी यांच्यात व्यावसायिक व्यवहार होते. वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक यंत्रसामग्री आरोपीने फिर्यादीकडून वेळोवेळी घेतली होती. त्यापोटीची रक्कम थकीत राहिल्याने परतफेडीसाठी आरोपीने ८८ लाख ५९ हजार ९०३ रुपयांचा चेक दिला होता.
फिर्यादीने हा चेक बँकेत जमा केल्यानंतर तो न वटता परत आला. त्यानंतर आरोपीला कायदेशीर नोटीस बजावण्यात आली. मात्र, त्यानंतरही थकीत रक्कम मिळाली नसल्याने अॅड. विशाल बर्गे आणि अॅड. युवराज जाधव यांच्या माध्यमातून न्यायालयात खटला दाखल करण्यात आला.
‘चेकचा गैरवापर झाला तर पोलिसांत तक्रार का नाही?’
न्यायालयीन सुनावणीदरम्यान आरोपीने संबंधित रक्कम परत केल्याचा तसेच पैसे उकळण्यासाठी आपल्याविरुद्ध खोटा खटला दाखल करण्यात आल्याचा बचाव घेतला.
या बचावाला प्रत्युत्तर देताना अॅड. विशाल बर्गे यांनी महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे न्यायालयासमोर मांडले. चेकचा गैरवापर होत असल्याचे आरोपीचे म्हणणे असेल, तर त्याबाबत पोलिसांत तक्रार का दाखल केली नाही? बँकेला चेकचे पैसे अदा करू नयेत, अशी सूचना का देण्यात आली नाही? कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर तत्काळ उत्तर देऊन आपली बाजू का मांडली नाही? तसेच चेकवरील स्वाक्षरी आरोपीने नाकारली नसल्याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले.
या मुद्द्यांच्या समर्थनार्थ सर्वोच्च न्यायालयाचे संबंधित निकाल तसेच उपलब्ध कागदपत्रे व पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात आले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि उपलब्ध पुराव्यांचा विचार करून न्यायालयाने आरोपीविरुद्ध निकाल दिला.
आरोपीला तीन महिन्यांचा कारावास; ९७ लाखांची नुकसानभरपाई
न्यायालयाने आरोपी जगदीश बाजीराव कदम यांना तीन महिन्यांचा कारावास सुनावला असून, फिर्यादीला ९७ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे.
या निकालामुळे चेक न वटल्याच्या प्रकरणात कायदेशीर पुरावे, कागदपत्रे आणि प्रभावी युक्तिवादाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. फिर्यादीतर्फे अॅड. विशाल बर्गे आणि अॅड. युवराज जाधव यांनी मांडलेल्या कायदेशीर मुद्द्यांची न्यायालयाने घेतलेली दखल या निकालातील महत्त्वाचा भाग ठरला.







