महापालिका क्षेत्रात प्रचार-प्रसिद्धी, नागरिकांचा सहभाग आणि सांस्कृतिक नोंदींसाठी समन्वित कार्यवाही
काशिनाथ शिंदे
पिंपरी: महाराष्ट्राच्या गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा, कला, संस्कृती आणि लोकजीवन जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नोडल अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशाने जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रात गणेशोत्सवाच्या अनुषंगाने विविध प्रचार-प्रसिद्धी उपक्रम राबविणे, संबंधित विभाग व संस्थांमध्ये समन्वय साधणे तसेच शासनाच्या निर्देशानुसार आवश्यक कार्यवाही करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील गणेशोत्सवाशी निगडित परंपरा, कला, हस्तकला, सजावट, कौटुंबिक प्रथा, खाद्यपरंपरा, कलाकार आणि लोककलावंत यांचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी Bappa.org हे डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. नागरिकांना आपल्या घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाशी संबंधित माहिती, छायाचित्रे आणि व्हिडिओ या माध्यमातून नोंदविता येणार आहेत.
या उपक्रमाची माहिती शहरातील गणेशोत्सव मंडळे, गृहनिर्माण संस्था, निवासी कल्याणकारी संघटना, सामाजिक व सांस्कृतिक संस्था तसेच नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. डिजिटल माध्यमे, समाजमाध्यमे, प्रचार साहित्य, फलक, उभे फलक तसेच क्यूआर संकेतांकाच्या माध्यमातून Bappa.org बाबत माहिती देण्यात येणार आहे.
शहरातील विविध भागांतील गणेशोत्सवाच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, कलावैशिष्ट्ये आणि लोकसहभागाची नोंद करणे, नागरिकांना या उपक्रमात सहभागी करून घेणे तसेच मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या कार्यवाहीचा नियमित अहवाल शासनास सादर करणे, अशी जबाबदारी नोडल अधिकाऱ्यांमार्फत पार पाडण्यात येणार आहे.
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख, लोकपरंपरा, कला आणि सामाजिक सहभाग यांचे जागतिक स्तरावर दस्तऐवजीकरण व्हावे, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक, गणेशोत्सव मंडळे, गृहनिर्माण संस्था तसेच सामाजिक व सांस्कृतिक संस्थांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.







