डसॉल्ट सिस्टीम फाउंडेशनच्या सहकार्याने ‘इंडस्ट्रियल एस्पायरा’ प्रशिक्षण; सीएनसी, डिझाईन, गुणवत्ता नियंत्रणासह रोजगारासाठी प्रशिक्षण
काशिनाथ शिंदे
पिंपरी : युवती व महिलांना अभियांत्रिकी तसेच उत्पादन क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यासाठी आवश्यक तांत्रिक कौशल्य आत्मसात करता यावे, या उद्देशाने इंजिनिअरिंग क्लस्टर, पुणे यांच्या वतीने महिलांसाठी सहा महिन्यांचे मोफत ऑफलाइन तांत्रिक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. ‘इंडस्ट्रियल एस्पायरा – ॲडव्हान्स सर्टिफिकेशन इन सीएनसी ऑपरेशन, डिझाईन अँड क्वालिटी कंट्रोल’ या प्रशिक्षणाची तिसरी बॅच २८ सप्टेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे.
डसॉल्ट सिस्टीम फाउंडेशन, पुणे यांच्या सामाजिक दायित्व निधीच्या सहकार्याने हे प्रशिक्षण पूर्णतः मोफत दिले जाणार आहे. प्रशिक्षणामध्ये सीएनसी प्रोग्रामिंग व ऑपरेशन, डिझाईन, गुणवत्ता नियंत्रण, उत्पादन प्रक्रिया, व्यक्तिमत्त्व विकास व संवादकौशल्य, प्रत्यक्ष औद्योगिक भेटी, प्रात्यक्षिक प्रशिक्षण तसेच प्रत्यक्ष कामावर आधारित प्रशिक्षणाचा समावेश आहे.
हे सहा महिन्यांचे प्रशिक्षण भोसरी एमआयडीसी येथील इंजिनिअरिंग क्लस्टर, पुणे येथे होणार आहे. किमान बारावी उत्तीर्ण आणि १८ ते २५ वर्षे वयोगटातील युवती व महिला या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे व परिसरातील अभियांत्रिकी आणि उत्पादन उद्योगांमध्ये रोजगार मिळवून देण्यासाठी रोजगार सहाय्यही उपलब्ध करून दिले जाणार आहे.
ग्रामीण भागातील निवडक पाच प्रशिक्षणार्थींसाठी निवास व भोजनाची सुविधा देखील पूर्णतः मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पहिल्या दोन बॅचला मिळालेल्या यशस्वी प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या बॅचचे आयोजन करण्यात आले आहे.
इंजिनिअरिंग क्लस्टर, पुणेचे संचालक सागर शिंदे यांनी तांत्रिक क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या युवती व महिलांनी या मोफत प्रशिक्षणाच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी इंजिनिअरिंग क्लस्टर, पुणे, ५३५ जे ब्लॉक, गवळी माथा, एमआयडीसी, भोसरी, पुणे येथे संपर्क साधावा. ई-मेल : finance@enggclusterpune.com







