गुन्हे शाखा युनिट ३ ची कारवाई; पिस्तुलासह जिवंत काडतूस जप्
काशिनाथ शिंदे
पिंपरी : सोशल मीडियावर पिस्तुलाचा फोटो प्रसारित करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या २२ वर्षीय तरुणाला गुन्हे शाखा युनिट ३ च्या पथकाने आळंदी परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतूस असा एकूण ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
मोहम्मद शरीफ मोहम्मद जुबेर मन्सुरी (वय २२, रा. मरकड रोड, पीसीएस चौक, आळंदी, ता. खेड, जि. पुणे; मूळ रा. सिंधिया, वॉर्ड क्रमांक १०, समस्तीपूर, बिहार) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.
गुन्हे शाखा युनिट ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, पोलीस हवालदार बाबा गरजे, पोलीस अमलदार बाळासाहेब खेडकर, दिलीप राठोड, अजित रुपनवर आणि तुषार वराडे हे आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाहिजे, फरारी व तडीपार आरोपींचा शोध तसेच रात्रीच्या गस्तीची ड्युटी करीत होते.
यावेळी पोलीस अमलदार बाळासाहेब खेडकर आणि दिलीप राठोड यांना आरोपीबाबत माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती वरिष्ठांना कळविल्यानंतर मिळालेल्या सूचनेनुसार पथकाने कारवाई करीत मोहम्मद शरीफ मन्सुरी याला ताब्यात घेतले.
झडतीदरम्यान त्याच्याकडून ५० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे एक पिस्तुल आणि एक हजार रुपये किमतीचे जिवंत काडतूस, असा एकूण ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्याला आळंदी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.






