१ किलो ४४ ग्रॅम गांजा जप्त; पाच आरोपी अटकेत, ८.५५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
काशिनाथ शिंदे : पिंपरी चिंचवड
पुणे | काळेपडळ : अवैध गांजा विक्री व पुरवठा करणाऱ्या टोळीवर काळेपडळ पोलिसांनी कारवाई करत पाच आरोपींना अटक केली. आरोपींकडून १ किलो ४४ ग्रॅम वजनाचा गांजा, चारचाकी वाहने आणि मोबाईल फोन असा एकूण ८ लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. २१ सप्टेंबर २०२६ रोजी काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपास पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार विशाल ठोंबरे, महादेव शिंदे, नितीन ढोले व गिरीराज जगदाळे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एस.आर.पी.एफ.च्या मोकळ्या मैदानात झाडाजवळ एक इसम संशयितरीत्या पांढऱ्या रंगाची पिशवी घेऊन उभा असून त्याच्याकडे गांजा असण्याची शक्यता आहे.
ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर यांना कळविण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड तसेच पोलीस अंमलदारांच्या पथकाने दोन पंचांसह घटनास्थळी छापा टाकला.
यावेळी योगेश प्रल्हाद अडसूळ (वय ४०, रा. स. नं. ४९, अखिल एकता कॉलनी, रेल्वे गेटजवळ, काळेपडळ, हडपसर, पुणे) याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १ किलो ४४ ग्रॅम गांजा हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला.
या प्रकरणी काळेपडळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४५९/२०२६, एनडीपीएस कायदा कलम ८(क), २०(ब)(ii)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासादरम्यान आरोपी योगेश अडसूळ याला गांजाचा पुरवठा करणाऱ्या अन्य आरोपींची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी विजय राजू हुबळीकर (वय २९), बबन बाबुराव दांडे (वय ३९), अशोक ऊर्फ अक्षय सतीश जाधव (वय २८), साहिल सुभाष ठोंबे (वय २७) आणि विकास संदीप बोडके (वय २०) यांना अटक केली.
आरोपींकडून एकूण ८ लाख ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल, त्यामध्ये चारचाकी वाहने व मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी आरोपींचे पूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड तपासले असता, कोथरूड, यवत, वानवडी, नगर तालुका आणि भिंगार पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न तसेच एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ-६ जीवन बेनीवाल आणि सहायक पोलीस आयुक्त हडपसर विभाग अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशा निंबाळकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अण्णासाहेब बाबर यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.
कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड, अमित शेटे, सपोफौ. राजस शेख तसेच पोलीस अंमलदार प्रवीण काळभोर, अमोल फडतरे, दाऊद सय्यद, प्रतीक लाहिगुडे, शाहीन शेख, निलेश देसाई, विशाल ठोंबरे, अतुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, प्रदीप बेडिसकर, महादेव शिंदे, गिरीराज जगदाळे आणि अमोल जाधव यांनी सहभाग घेतला.







