काशिनाथ शिंदे
पुणे : पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवरून शिवसेना पुणे शहरप्रमुख तथा महापालिका नगरसेवक प्रमोद (नाना) भानगिरे यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. गैरहजेरीबद्दल आकारला जाणारा एक हजार रुपयांचा दंड रद्द करा, कर्मचाऱ्यांचा हक्काचा ओव्हरटाईम व बोनस द्या, तसेच सातव्या वेतन आयोगातील प्रलंबित फरकाची रक्कम तातडीने अदा करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
वाहतूक कोंडी, तांत्रिक बिघाड किंवा अन्य कारणांमुळे ड्युटी रद्द झाल्यास कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष बजावलेल्या कामाच्या तासांचा विचार करून त्यांना नियमानुसार ओव्हरटाईम देण्यात यावा. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यादरम्यान अतिरिक्त सेवा बजावणाऱ्या चालकांसह इतर कर्मचाऱ्यांनाही ओव्हरटाईम मिळावा, अशी मागणी भानगिरे यांनी केली.
दिवाळी बोनस व बक्षिसासंदर्भातील करार २०२६ मध्ये संपुष्टात आल्याने प्रशासनाने तातडीने नवीन करार करावा. तसेच सातव्या वेतन आयोगाचा दुसरा व चौथा हप्ता एकत्रितपणे देऊन कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
वर्षानुवर्षे एकाच पदावर कार्यरत असलेल्या स्थायी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देणे, २००७ पासूनचा २० रुपयांचा महागाई भत्ता १०० रुपये करून तो वेतनात समाविष्ट करणे, १०, २० व ३० वर्षांची आश्वासित प्रगती योजना लागू करणे आणि २०२४ पासूनच्या बेसिक वेतनातील तफावत दूर करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
“कर्मचाऱ्यांच्या श्रमावर पीएमपीएमएलची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी आहे. त्यांच्या हक्काचे वेतन, ओव्हरटाईम आणि बोनस देताना प्रशासनाने टाळाटाळ करू नये. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आक्रमक भूमिका घ्यावी लागेल,” असा इशारा प्रमोद भानगिरे यांनी दिला.







