काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. केंद्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ‘अतिउत्कृष्ट सेवा पदका’साठी पोलीस दलातील पाच अधिकारी पात्र ठरले असून, त्यांच्या उल्लेखनीय आणि प्रदीर्घ सेवेला केंद्र शासनाकडून गौरविण्यात आले आहे.
यामध्ये अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विठ्ठे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांचा समावेश आहे.
कर्तव्यनिष्ठा, शिस्त, धाडसी निर्णयक्षमता आणि पोलीस सेवेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत या अधिकाऱ्यांना ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस दलात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासोबतच गुन्हेगारीला आळा घालणे, नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे आणि पोलीस दलाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी या अधिकाऱ्यांनी बजावलेल्या भूमिकेचे विशेष कौतुक होत आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या या सन्मानामुळे पिंपरी-चिंचवड पोलीस दलाचा गौरव आणखी उंचावला असून, पदकप्राप्त अधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







