काशिनाथ शिंदे : आळंदी
पिंपरी-चिंचवड : आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध देशी दारूची साठवणूक करून विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या महिलेकडून गुन्हे शाखा, युनिट-३च्या पथकाने तब्बल ३४ हजार ७२० रुपयांचा देशी दारूचा साठा जप्त केला. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
गुन्हे शाखा, युनिट-३चे पथक आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सोळूगाव येथील भारत पेट्रोल पंपासमोर अवैध दारूचा साठा आढळून आला. पथकाने तत्काळ कारवाई करीत शोभा गुलाब गोडसे (वय ६५, रा. सोळूगाव, ता. खेड, जि. पुणे) हिच्याकडून दारू जप्त केली.
जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये ३० हजार ७२० रुपये किमतीचे देशी टॅंगो पंचचे आठ बॉक्स, त्यामध्ये १८० मिलीच्या एकूण ३८४ काचेच्या बाटल्या, तसेच चार हजार रुपये किमतीचा ९० मिलीच्या १०० प्लास्टिक बाटल्यांचा एक बॉक्स असा एकूण ३४ हजार ७२० रुपयांचा मुद्देमाल आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-३चे पोलीस हवालदार गर्जे, पोलीस शिपाई राठोड, पोलीस शिपाई खेडेकर आणि पोलीस शिपाई वराडे यांच्या पथकाने केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत राठोड व खेडेकर यांनी दमदार कामगिरी बजावली.







