प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्यावर गोळीबारासह धारदार शस्त्राने हल्ला; पाच जणांचा सहभाग असल्याचा संशय
काशिनाथ शिंदे
ठाणे : मानपाडा परिसरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. गणेश नगर येथील कार्यालयात असताना त्यांच्यावर दोन राऊंड गोळीबार करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर धारदार शस्त्रानेही हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या पूर्णेकर यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
या घटनेनंतर मानपाडा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. पोलिसांनी पप्या शिंदे आणि आकाश निमसे या दोघांना ताब्यात घेतले आहे. निखिल यादव, संतोष कनोजिया आणि आणखी एका अनोळखी व्यक्तीसह एकूण पाच जणांचा या हल्ल्यात सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.
उर्वरित संशयितांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेसह पोलिसांची नऊ पथके तैनात करण्यात आली आहेत. हल्ल्यामागील नेमके कारण, कटाचा पूर्वनियोजितपणा आणि इतर संशयितांची भूमिका याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
सीसीटीव्ही फुटेजमुळे तपासाला दिशा
हल्ल्यापूर्वी दोन व्यक्ती चेहऱ्यावर रुमाल बांधून दुचाकीवरून पूर्णेकर यांच्या कार्यालयाच्या दिशेने जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. या फुटेजच्या आधारे संशयितांची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
दरम्यान, पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी यापूर्वी धमक्या मिळाल्याचा आरोप केला आहे. त्यांचे मोठे भाऊ जयनाथ पूर्णेकर यांनी हल्ल्यापूर्वी रेकी करण्यात आल्याचा दावा केला आहे. या दाव्याचीही पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे.
हल्ल्याचे नेमके कारण आणि या प्रकरणातील सर्व संशयितांची भूमिका तपास पूर्ण झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.







