थकीत बिलामुळे २६ सप्टेंबरला वीजपुरवठा खंडित; भरणा होताच महावितरणची तातडीने कारवाई
काशिनाथ शिंदे
पुणे: थकीत वीजबिलामुळे अभिनेत्री तनिषा मुखर्जी यांच्या लोणावळा येथील फार्महाऊसचा २६ सप्टेंबर रोजी खंडित करण्यात आलेला वीजपुरवठा बुधवारी (दि. ३०) वीजबिलाचा भरणा होताच महावितरणकडून तातडीने पूर्ववत करण्यात आला.
लोणावळा येथील फार्महाऊससाठी तनिषा मुखर्जी यांच्या नावावर महावितरणची तीन फेजची वीजजोडणी आहे. मोठ्या परिसरात असलेल्या या फार्महाऊसचे वीजमीटर प्रवेशद्वारापासून सुमारे ३०० फूट अंतरावर आहे. प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक तैनात असल्याने मीटर रीडिंगसाठी तेथील व्यवस्थापकाची परवानगी घ्यावी लागते.
मुखर्जी यांनी जुलै २०२६ चे वीजबिल ५ ऑगस्ट रोजी भरले होते. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांची देयके तयार झाली. ऑगस्ट महिन्याच्या वीजबिलाच्या भरण्याची मुदत ४ सप्टेंबर रोजी संपली. त्यानंतर नियमानुसार त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर वीजबिल भरण्याबाबत संदेशाद्वारे नोटीस देण्यात आली.
१९ सप्टेंबर रोजी नोटीसची मुदत संपल्यानंतरही स्थानिक वीज कर्मचाऱ्यांनी फार्महाऊसच्या व्यवस्थापकाकडे वीजबिल भरण्याची वारंवार विनंती केली. मात्र, वीजबिलाचा भरणा न झाल्याने महावितरणने नियमानुसार २६ सप्टेंबर रोजी वीजपुरवठा खंडित केला.
दरम्यान, बुधवारी (दि. ३०) दुपारी तनिषा मुखर्जी यांनी ऑनलाइन पद्धतीने ३ हजार रुपयांचे देयक भरले. देयकाचा भरणा झाल्यानंतर महावितरणने तातडीने फार्महाऊसचा वीजपुरवठा पूर्ववत केला.
वीजबिल थकीत राहिल्यास नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते. तसेच थकीत बिलाचा भरणा झाल्यानंतर वीजपुरवठा पूर्ववत केला जातो. या प्रकरणातही महावितरणने नियमानुसार कारवाई केली असून, बिलाचा भरणा होताच वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
सोबत : तनिषा मुखर्जी यांच्या फार्महाऊसचे प्रवेशद्वार







