काशिनाथ शिंदे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे जिल्हा परिषद क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित शालेय तलवारबाजी स्पर्धेत रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचा विद्यार्थी सक्षम जाधव याने १४ वर्षांखालील वयोगटात उल्लेखनीय कामगिरी करत सर्व फेऱ्यांमध्ये विजय मिळविला.
इयत्ता सहावीमध्ये शिकणाऱ्या सक्षमने स्पर्धेतील एकूण सहा फेऱ्यांमध्ये प्रत्येकी पाच गुणांचे लक्ष्य साध्य करत उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने सर्व सहा फेऱ्या जिंकत आपल्या खेळातील कौशल्याची छाप पाडली.
सक्षमला एस. बी. पाटील पब्लिक स्कूलच्या क्रीडा शिक्षिका प्रिया सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच, इयत्ता तिसरीपासून तो बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये छत्रपती पुरस्कारप्राप्त श्वेता चंडालिया यांच्या मार्गदर्शनाखाली तलवारबाजीचा नियमित सराव करत आहे.
कासारवाडी प्राथमिक शाळेत झालेल्या या स्पर्धेत २४ शाळांनी सहभाग घेतला होता. विविध वयोगट आणि प्रकारांमध्ये सुमारे ५६ वैयक्तिक खेळाडू तसेच १८ संघांनी सहभाग नोंदविला.
पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये शालेय अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांना वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये प्रावीण्य मिळविण्यासाठी आवश्यक सुविधा आणि प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाते. या सुविधांचा आणि मार्गदर्शनाचा लाभ घेत सक्षमने हे यश संपादन केले असल्याचे प्राचार्य डॉ. बिंदू सैनी यांनी सांगितले.
सक्षम जाधवच्या या यशाबद्दल पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सक्षम जाधव, क्रीडा शिक्षिका प्रिया सूर्यवंशी आणि मुख्याध्यापिका पद्मावती बंडा यांचे अभिनंदन केले.







