धाराशिव ते जामखेड कनेक्शन; चार जणांना अटक, दोघे फरार
काशिनाथ शिंदे
कलाकेंद्रातील वादातून ३१ वर्षीय गर्भवती नर्तिकेची हत्या करून तिचा मृतदेह निर्जन जंगलात नेऊन जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धुळे पोलिस आणि धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या तीन दिवसांत या प्रकरणाचा छडा लावत चार आरोपींना अटक केली आहे. तर दोन आरोपी अद्याप फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.
पिंकी हनुमंत काटकर असे मृत नर्तिकेचे नाव आहे. पिंकी ही अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील सप्तसूर सांस्कृतिक कला केंद्रात नर्तिका म्हणून काम करत होती. २२ सप्टेंबर रोजी चाळीसगाव-धुळे महामार्गालगतच्या गरताडबारी घाट परिसरातील निर्जन जंगलात तिचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली. कलाकेंद्रातील वादातून पिंकीला बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा चौफुलीजवळील एका घरात नेण्यात आले. तेथे तिच्यावर मारहाण करण्यात आली. मारहाणीनंतर ती बेशुद्ध पडली. तिचा मृत्यू झाल्याचे समजून आरोपींनी मृतदेह वाहनातून धुळे जिल्ह्यातील जंगलात नेला.
त्यानंतर गरताडबारी घाट परिसरातील जंगलात वाहन थांबवून पिंकीचा मृतदेह जाळण्यात आला. तसेच घटनेचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
धुळे पोलिस आणि धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने समन्वयाने तपास करत या प्रकरणातील चार आरोपींना अटक केली आहे. आणखी दोन आरोपी फरार असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. कलाकेंद्रातील वाद नेमका कोणत्या कारणातून झाला आणि या हत्येमागील अन्य बाबींचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.






