२०१९ पॅटर्नच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या ‘बॅकलॉग सप्लिमेंटरी परीक्षा’ मागणीला पाठिंबा
काशिनाथ शिंदे
पिंपरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या २०१९ पॅटर्नमधील अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांच्या पेपर तपासणीतील त्रुटी तसेच प्रश्नपत्रिकांमधील तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे संपूर्ण शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ‘बॅकलॉग सप्लिमेंटरी परीक्षा’ घेण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठ परिसरात आंदोलन व उपोषण करत आहेत.
विद्यापीठाने २०२४ पॅटर्नच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याची संधी दिली आहे. मग २०१९ पॅटर्नच्या विद्यार्थ्यांवरच अन्याय का, असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष आणि भविष्यातील करिअर धोक्यात येऊ नये, यासाठी विद्यापीठ प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या या न्याय्य मागणीला पाठिंबा देण्यासाठी मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे आणि शिवसेना गटनेते विश्वजितजी बारणे यांच्या सूचनेनुसार युवासेना जिल्हाप्रमुख सागर पाचर्णे यांनी विद्यापीठात जाऊन उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली.
यावेळी विश्वजितजी बारणे यांनी विद्यार्थ्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांच्या मागण्यांना खंबीर पाठिंबा दर्शविला. तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी विद्यापीठातील वरिष्ठ अधिकारी तसेच पोलीस प्रशासनाशी सविस्तर चर्चा करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी संबंधित हा प्रश्न संवेदनशील असून, विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांची भूमिका समजून घेत तातडीने योग्य निर्णय घ्यावा, अशी भूमिका युवासेनेकडून व्यक्त करण्यात आली.
यावेळी शिव सहकार सेनेचे शहरप्रमुख संभाजी भेगडे, महिला चिंचवड विधानसभा प्रमुख आरतीताई भेगडे, युवासेना उपशहरप्रमुख दिगंबर गुंजाळ, विद्यापीठ कक्ष अध्यक्ष योगेश बेंद्रे, विभागप्रमुख शुभम खानविलकर आदी उपस्थित होते.







