Oplus_131072
काशिनाथ शिंदे :बावधन परिसरात गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या धडक कारवाईत दोन संशयितांना अटक करून त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तुले, जिवंत काडतुसे आणि एक दुचाकी असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, बावधन परिसरात काही व्यक्ती बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून संशयितांना ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून दोन गावठी पिस्तुले, जिवंत काडतुसे तसेच दुचाकी वाहन आढळून आले.
या कारवाईमुळे परिसरातील संभाव्य गंभीर गुन्हा उघडकीस येण्यापूर्वीच पोलिसांनी तो हाणून पाडल्याचे मानले जात आहे. आरोपींविरुद्ध शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही शस्त्रे कुठून आणली आणि त्यांचा वापर कोणत्या उद्देशाने केला जाणार होता, याचा तपास पोलीस करीत आहेत.
पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
