ध्वनिप्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रभावी कारवाई; शांतता व सुव्यवस्थेच्या भूमिकेचे नागरिकांकडून कौतुक
काशिनाथ शिंदे
चिखली : चिखली परिसरातील वाढत्या ध्वनिप्रदूषणाला आळा घालत मोठ्या आवाजातील डीजेवर प्रभावी कारवाई करून परिसर डीजेमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांचा राष्ट्रवादी काँग्रेस वाहतूक सेलचे अध्यक्ष विनोद वरखडे पाटील व मित्र परिवाराच्या वतीने सन्मान करण्यात आला.
सण, उत्सव तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या आवाजात डीजे वाजविल्यामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, लहान मुले तसेच रुग्णांना होणारा त्रास लक्षात घेऊन रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलिसांनी ध्वनिप्रदूषणाविरोधात प्रभावी भूमिका घेतली. पोलिसांच्या या कारवाईचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले.
सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबरोबरच नागरिकांना शांततामय वातावरण मिळावे, यासाठी पोलिसांनी घेतलेली भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले. रणजित जाधव यांच्या कारवाईबद्दल नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी बोलताना विनोद वरखडे म्हणाले, “कायदा व सुव्यवस्था राखतानाच नागरिकांना शांततामय वातावरण मिळणे आवश्यक आहे. ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी पोलिस प्रशासनाने घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. यापुढेही पोलिस प्रशासनाला नागरिकांचे सहकार्य कायम राहील.”
या सन्मान सोहळ्यास सामाजिक कार्यकर्ते भरत मोहोड, सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती आश्विनी कुलकर्णी, युक्ता कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते योगेश जेजूरकर, अभिजित बापट, तहल मातव, विवेक कुमार, चेतन आग्रवाल आदी उपस्थित होते.






