आजीची हत्या केल्यानंतर नातू स्वतःहून सांगवी पोलीस ठाण्यात हजर; औंध जिल्हा रुग्णालयात उपचारापूर्वीच मृत घोषित
काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड : मालमत्तेच्या वादातून नातवाने स्वतःच्या ६० वर्षीय आजीच्या गळ्यात चाकू खुपसून हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ९ ऑक्टोबर) सकाळी नवी सांगवी परिसरात घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. हत्येनंतर संबंधित नातवाने स्वतःहून सांगवी पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
मालमत्तेच्या वादातून टोकाचे पाऊल
मंगल बाबुराव शिंगोरे (वय ६०, रा. शिंगोरे बिल्डिंग, धर्मवीर बँकेशेजारी, नवी सांगवी, पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे. ऑकर किसन शिंगोरे (वय ३०, रा. राजीव गांधी नगर, गल्ली क्रमांक १, पिंपळे गुरव) असे आरोपी नातवाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास मालमत्तेच्या वादातून ऑकर याने आजी मंगल शिंगोरे यांच्या गळ्यात चाकू खुपसल्याची माहिती आहे. त्यानंतर सकाळी साडेनऊच्या सुमारास तो स्वतःहून सांगवी पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
बाथरूममध्ये आढळल्या गंभीर जखमी अवस्थेत
घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घरातील बाथरूममध्ये मंगल शिंगोरे या गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी त्यांना तातडीने औंध जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून घटनास्थळाची पाहणी
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ संदीप आटोळे, सहायक पोलीस आयुक्त सांगवी विभाग मनीषा कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमोल नांदेकर यांच्यासह अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात पुढील तपास आणि कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. मालमत्तेच्या वादातून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.







