माय मराठीचा साहित्यवारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरज

अभिजात मराठी भाषा सप्ताहात ‘माय मराठीचे साहित्यविश्व’ विषयावर मान्यवरांचे विचारमंथन

काशिनाथ शिंदे

पिंपरी : मराठी साहित्याला समृद्ध आणि प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. इतिहास, संस्कृती, परंपरा, संघर्ष, संवेदना आणि स्वप्ने यांचे प्रतिबिंब मराठी साहित्यामध्ये उमटले आहे. काळानुसार साहित्याची भाषा आणि स्वरूप बदलत गेले, तरी मानवी जीवन, त्यातील प्रश्न आणि भावभावना हे साहित्याचे केंद्रस्थानी राहिलेले विषय आहेत. हा समृद्ध साहित्यवारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे मत साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताहांतर्गत पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात ‘माय मराठीचे साहित्यविश्व’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चासत्रात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र कांकरिया, राजन लाखे, ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे आणि ज्येष्ठ लेखक प्रा. संजय पवार यांनी सहभाग घेतला. मराठी साहित्याची समृद्ध परंपरा, त्यातील वैविध्य आणि बदलत्या काळानुसार साहित्याच्या स्वरूपात झालेले परिवर्तन यावर यावेळी सखोल विचारमंथन करण्यात आले.

डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी मराठी साहित्यावर विविध भाषांच्या प्रभावाविषयी भूमिका मांडली. ते म्हणाले, “विविध भाषांच्या संपर्कातून मराठीमध्ये अनेक नवे शब्द आले आणि त्यामुळे भाषेची समृद्धी वाढली. काही नाटके आणि कवितांवर इंग्रजी साहित्याचा प्रभाव दिसून येतो. ग्रामीण भागातून तसेच उपेक्षित समाजघटकांतून पुढे आलेले साहित्य हे अलीकडच्या काळातील महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.”

ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी यादवकालापासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेपर्यंतच्या साहित्यप्रवासाचा आढावा घेतला. ते म्हणाले, “संतपरंपरा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यामुळे मराठी भाषेला व्यापक सामाजिक आणि सांस्कृतिक आधार मिळाला. समाजाला एकत्र जोडण्याचे आणि राष्ट्रभावना जागविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मराठी साहित्याने केले आहे. मराठीच्या विविध बोलीभाषांनाही प्रमाणभाषेइतकेच महत्त्व दिले पाहिजे.”

See also  प्रत्येकाने ‘श्रीकृष्ण’ होण्याची वेळ आली! सद्गुणांचा अतिरेक करून गप्प बसायचे नाही; डॉ. संजय उपाध्ये यांचे प्रतिपादन

प्रा. संजय पवार यांनी मराठी साहित्याच्या निर्मितीमागील प्रेरणा आणि त्याच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य केले. ते म्हणाले, “‘लीळाचरित्र’ आणि ‘विवेकसिंधू’ हे मराठी साहित्यपरंपरेतील महत्त्वाचे प्राचीन ग्रंथ आहेत. एकोणिसाव्या शतकानंतर साहित्याचे स्वरूप आणि मांडणी बदलत गेली. मराठी साहित्याच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे.”

ज्येष्ठ साहित्यिक राजन लाखे यांनी मराठीतील गद्य आणि पद्य साहित्यपरंपरेचा वेध घेतला. ते म्हणाले, “‘लीळाचरित्र’ हा मराठीतील आद्य गद्यग्रंथ, तर ‘विवेकसिंधू’ हा आद्य पद्यग्रंथ म्हणून ओळखला जातो. ‘ज्योतिषरत्नमाला’सारख्या रचनांचेही संदर्भ आढळतात. संत, पंत आणि तंत या साहित्यपरंपरांनी मराठी साहित्य समृद्ध केले. वास्तव, अनुभव आणि कल्पनांच्या आधारे मराठीमध्ये विविध साहित्यप्रकार विकसित झाले.”

चर्चासत्राचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक राज अहेरराव यांनी नव्या पिढीला मराठी साहित्याची ओळख करून देण्याची गरज अधोरेखित केली. ते म्हणाले, “मराठी भाषेचे अभिजातपण जपण्यासाठी नव्या पिढीला तिचा इतिहास आणि साहित्याचा प्रवास समजावून सांगणे आवश्यक आहे. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीच्या ‘गाथासप्तशती’ला प्राचीन साहित्यपरंपरेत महत्त्वाचे स्थान आहे. सातवाहन राजा हाल यांच्याशी संबंधित महाराष्ट्री प्राकृत भाषेतील या गाथासंग्रहातून त्या काळातील जीवन आणि लोकभावनांचे दर्शन घडते.”

चर्चासत्राचा समन्वय राजेंद्र घावटे यांनी साधला. किशोर केदारी यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले, तर प्रशासन अधिकारी दत्तात्रय सूर्यवंशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

  • Related Posts

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    काशिनाथ शिंदे पिंपरी  : आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्व २०२६-२०२७ च्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. यासह विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडीही जाहीर करण्यात आल्या. Read moreमुंबई…

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    काशिनाथ शिंदे पिंपरी-चिंचवड : क्रीडा संकुलातील साफसफाई आणि टेनिस नेट बांधण्याचे काम सुरू असताना झालेल्या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला, तर दुसरा कामगार जखमी झाला. ही घटना १८ ऑक्टोबर २०२६…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे प्रबोधन पर्वाच्या अध्यक्षपदी नानासाहेब कांबळे यांची निवड!

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    टेनिस नेट बांधण्याच्या कामात निष्काळजीपणा; शिडीवरून पडलेल्या कामगाराचा मृत्यू, दुसरा जखमी

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    अनोळखी लिंकवर क्लिक करणे महागात; महिलेची ₹४० हजारांची फसवणूक, येरवडा पोलिसांकडून संपूर्ण रक्कम परत!

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    डोंगरीत ANCचा ड्रग्ज तस्करांवर दणका! १.२४ कोटींचा हायड्रो गांजा जप्त; दोघांना अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक

    मुंबईत एमडी ड्रग्जविरोधात पोलिसांचा दणका! १.२८ कोटींचे मेफेड्रोन जप्त; एकाला अटक

    बुधवार पेठेत पोलिसांची मध्यरात्री धडक! सहा बांगलादेशी महिला आढळल्या; दलाल ताब्यात

    बुधवार पेठेत पोलिसांची मध्यरात्री धडक! सहा बांगलादेशी महिला आढळल्या; दलाल ताब्यात