नगरीचे शिल्पकार दिवंगत अण्णासाहेब मगर यांना अभिवादन; रस्सीखेच आणि पैठणीच्या खेळात अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
काशिनाथ शिंदे
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा ४४ वा वर्धापन दिन सोमवारी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पिंपरी येथील महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत रक्तदान शिबिरासह विविध मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर रवि लांडगे आणि आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नगरीचे शिल्पकार, माजी नगराध्यक्ष दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या प्रतिमेस आणि पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
या कार्यक्रमाला स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले, सहआयुक्त मनोज लोणकर, शहर अभियंता मनोज सेठिया, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, उपआयुक्त अण्णा बोदडे, सचिन पवार, व्यंकटेश दुर्वास, संदीप खोत, पंकज पाटील, सहशहर अभियंता बापू गायकवाड, विशेष अधिकारी किरण गायकवाड, प्रशासन अधिकारी दत्ता सूर्यवंशी, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, पिंपरी-चिंचवड कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, उपाध्यक्षा सुप्रिया जाधव, महादेव बोत्रे यांच्यासह विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अण्णासाहेब मगर यांच्या कार्याचे स्मरण
पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या दिवंगत अण्णासाहेब मगर यांच्या कार्याचे स्मरण करून महापालिकेच्या लोकसेवेच्या वाटचालीला उजाळा देण्यात आला. औद्योगिक नगरीपासून आधुनिक आणि वेगाने विकसित होणाऱ्या शहरापर्यंतचा पिंपरी-चिंचवडचा प्रवास दूरदृष्टी, सातत्यपूर्ण विकासकामे आणि नागरिकांच्या सहभागातून घडला आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश
वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला. रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमातून समाजाप्रती असलेली जबाबदारी अधोरेखित करण्यात आली. वर्धापन दिनाचा आनंद साजरा करतानाच सामाजिक हिताच्या उपक्रमांना प्राधान्य देण्यात आले.
रस्सीखेच स्पर्धेत चुरस; पैठणीच्या खेळाने वाढवली रंगत
महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित रस्सीखेच स्पर्धा विशेष आकर्षण ठरली. स्पर्धकांनी दाखवलेला उत्साह, जिद्द आणि सांघिक भावना यामुळे कार्यक्रमात चैतन्य निर्माण झाले. दैनंदिन प्रशासकीय कामकाजाच्या धावपळीतून विरंगुळ्याचे क्षण मिळाल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्पर्धांचा मनमुराद आनंद घेतला.
महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित पैठणीच्या खेळानेही कार्यक्रमात विशेष रंगत आणली. विविध खेळ आणि मनोरंजनात्मक स्पर्धांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमांमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांमधील स्नेहभाव, परस्पर संवाद आणि सांघिक एकोपा वृद्धिंगत होण्यास मदत झाली. संपूर्ण महापालिका परिवारात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
लोकाभिमुख सेवांचा संकल्प
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने नागरी सुविधा, पायाभूत विकास, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता आणि सार्वजनिक सेवांच्या माध्यमातून शहराच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. शहराचा गौरवशाली वारसा जपत बदलत्या काळानुसार आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांचे जीवनमान उंचावणे, हा संकल्प वर्धापन दिनानिमित्त व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले…
“पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा वर्धापन दिन हा शहराच्या विकासप्रवासाचा आणि सामूहिक कर्तृत्वाचा गौरव करणारा दिवस आहे. यानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरातून सामाजिक बांधिलकीचा, तर विविध स्पर्धांमधून संघभावना आणि एकोप्याचा संदेश देण्यात आला. ‘कटिबद्ध जनहिताय’ या ब्रीदवाक्याप्रमाणे नागरिकांना अधिक दर्जेदार व लोकाभिमुख सेवा देण्यासाठी महापालिका प्रशासन सदैव कटिबद्ध आहे.”
— डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका







