वर्धापन दिनानिमित्त झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागाचा पुढाकार; सर्व कार्यालयांत उपक्रम राबविण्याचा विक्रांत बगाडे यांचा निर्धार
कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्पाचीही पाहणी; युवकांच्या रोजगारासाठी आधुनिक कौशल्य प्रशिक्षणावर भर
काशिनाथ शिंदे
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून झोपडपट्टी पुनर्वसन व निर्मूलन विभागाच्या वतीने ‘शून्य कचरा कार्यालय’ या पर्यावरणपूरक उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या हस्ते चिंचवड येथील विभागाच्या मुख्य कार्यालयात या उपक्रमाचे उद्घाटन झाले. कार्यालयीन स्तरावर कचऱ्याचे योग्य वर्गीकरण, पुनर्वापर आणि ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खतनिर्मितीला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम महापालिकेच्या अन्य कार्यालयांसाठीही आदर्श ठरणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहराची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन करणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान आहे. प्रत्येक कार्यालयाने स्वतःपासून सुरुवात करून कचऱ्याचे वर्गीकरण आणि योग्य विल्हेवाट लावण्याची सवय अंगीकारल्यास या समस्येवर मात करणे शक्य होईल, असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी केले.
यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी चिंचवड येथील कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्पालाही भेट देऊन तेथील प्रशिक्षण उपक्रमांची पाहणी केली. बदलत्या रोजगारविश्वाच्या गरजा लक्षात घेऊन युवकांना आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण देणे, तसेच प्रशिक्षणानंतर त्यांना प्रत्यक्ष रोजगार मिळतो की नाही, याचा नियमित आढावा घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
सर्व महापालिका कार्यालयांत उपक्रम राबविणार
अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी ‘शून्य कचरा कार्यालय’ उपक्रमाचे कौतुक करत भविष्यात महापालिकेच्या सर्व कार्यालयांत ही संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले. त्याची सुरुवात मुख्य प्रशासकीय इमारतीपासून करण्यात येणार आहे. कार्यालयीन कचऱ्याचे योग्य विलगीकरण, पुनर्वापर आणि टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याच्या उपक्रमांमुळे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांमध्ये कचरा व्यवस्थापनाविषयी जागरूकता वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक युवकांना विविध अभ्यासक्रमांचे मोफत प्रशिक्षण मिळाले असून, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. मात्र, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांच्या रोजगारस्थितीचा दर तीन महिन्यांनी आढावा घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी नियमित सर्वेक्षण करून रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यावर भर द्यावा, अशी सूचना बगाडे यांनी केली.
नर्सिंग, हॉटेल व्यवसाय तसेच परदेशातील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन अभ्यासक्रमांची आखणी करावी. संबंधित क्षेत्रांतील मनुष्यबळाची मागणी लक्षात घेऊन प्रशिक्षण दिल्यास युवकांसाठी करिअरच्या नव्या वाटा खुल्या होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आधुनिक कौशल्य प्रशिक्षणातून युवकांना रोजगाराच्या संधी
अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी सांगितले की, पिंपरी-चिंचवड शहरात सध्या दहा ठिकाणी कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्प कार्यान्वित असून, युवकांना त्यांच्या आवडीनुसार विविध अभ्यासक्रमांचे मोफत प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणाचा लाभ घेणाऱ्या महिलांचे प्रमाण अधिक असणे ही विशेष कौतुकाची बाब आहे.
बदलत्या काळानुसार रोजगाराच्या संधीही बदलत आहेत. त्यामुळे ग्राफिक रचना, डिजिटल विपणन, कृत्रिम बुद्धिमत्ता, चित्रफीत संपादन आणि चलत्-चित्ररचना अशा आधुनिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर परदेशातील रोजगाराच्या संधींचा अभ्यास करून युवकांना परदेशी भाषांचे ज्ञान दिल्यास त्यांना जागतिक स्तरावर करिअरच्या अधिक संधी मिळू शकतील, असे जंगम यांनी नमूद केले.
कर्मचाऱ्यांच्या सहभागातून शून्य कचऱ्याचे उद्दिष्ट
उप आयुक्त अण्णा बोदडे म्हणाले की, कार्यालयातील कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन ‘शून्य कचरा कार्यालय’ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे.
दैनंदिन कामकाजात कचऱ्याचे वर्गीकरण, पुनर्वापर आणि योग्य विलगीकरणाची सवय अंगीकारण्याच्या सूचना अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी सर्वांचे सहकार्य लाभत असून, प्रत्येकाने पर्यावरणपूरक सवयींचा अवलंब केल्यास कार्यालयातील कचऱ्याचे प्रभावी व्यवस्थापन शक्य होईल. स्वच्छ, सुंदर आणि हरित पिंपरी-चिंचवडच्या उद्दिष्टपूर्तीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काच, कागद, धातू आणि ई-कचऱ्यासाठी स्वतंत्र डबे
‘शून्य कचरा कार्यालय’ उपक्रमांतर्गत विभागाच्या मुख्य कार्यालयात कचऱ्याचे वर्गीकरण करण्यासाठी स्वतंत्र डब्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. काच, रद्दी कागद, धातू, स्वच्छ पॉलिथिन, स्वच्छ प्लास्टिक आणि ई-कचरा यांचे स्वतंत्र संकलन केले जाणार आहे. तसेच, ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत तयार करण्यासाठी सेंद्रिय खतनिर्मिती ड्रमची व्यवस्था करण्यात आली आहे.
या व्यवस्थेमुळे पुनर्वापरयोग्य वस्तूंचे स्वतंत्र संकलन, जैवविघटनशील कचऱ्याचे व्यवस्थापन आणि अंतिम विल्हेवाटीसाठी पाठवल्या जाणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यास मदत होणार आहे. कार्यालयीन स्तरावर पर्यावरणपूरक कार्यपद्धती विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
महापालिका आयुक्तांचा स्वच्छतेवर भर
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे ही प्रशासनासह प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे नमूद केले. ‘शून्य कचरा कार्यालय’ उपक्रमाचा विस्तार अन्य कार्यालयांत करून स्वच्छ, सुंदर आणि हरित पिंपरी-चिंचवडच्या दिशेने ठोस पावले उचलण्यात येतील. तसेच, कौशल्यम लाईटहाऊससारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून युवकांना बदलत्या रोजगाराच्या संधींनुसार कौशल्य प्रशिक्षण देऊन स्वावलंबी बनविण्यावर महापालिकेचा भर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
उपस्थिती
यावेळी उप आयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त दशरथ कांबळे, कार्यकारी अभियंता शेखर गुरव, आसरा फाऊंडेशनच्या अध्यक्षा अर्चना मोरे, कौशल्यम लाईटहाऊस प्रकल्प व्यवस्थापक अमृता बहुलेकर, आयपीसीएचे प्रतिनिधी दत्ता हेंद्रे, वैभव नसुरडे, आशिष कुंभलकर, महापालिका कर्मचारी आणि लाईटहाऊस प्रकल्पातील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.







