६०,८०४ वीजपुरवठा तक्रारींचे निराकरण; ११,९९२ वीजबिल तक्रारी निकाली
काशिनाथ शिंदे
पुणे: महावितरणच्या सेवा सेतू अभियानाला पुणे परिमंडलात चांगला प्रतिसाद मिळत असून, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत २,५७८ वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. अभियानादरम्यान तब्बल ६०,८०४ वीजपुरवठ्याशी संबंधित तक्रारी आणि ११,९९२ वीजबिलविषयक तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. याशिवाय ग्राहकांच्या नावात बदल करण्याची ४,५१२ प्रकरणे पूर्ण करण्यात आली असून, वीजपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी २३४ रोहित्रे बदलण्यात आली आहेत.
महावितरणचे कार्यकारी संचालक दिनेश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुणे परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता ज्ञानदेव पडळकर यांच्या नेतृत्वाखाली या अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे.
सूर्यघर योजनेत २,५७८ वीजजोडण्या कार्यान्वित
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत गणेशखिंड मंडलात ७१४, पुणे ग्रामीण मंडलात १,११८ आणि रास्तापेठ मंडलात ७४६ वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. तसेच ‘मागेल त्याला सौर कृषी पंप’ योजनेअंतर्गत ३१६ सौर कृषी पंप सुरू करण्यात आले आहेत. स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय छतावरील सौरऊर्जा (SMART) योजनेअंतर्गत ११ वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.
नवीन वीजजोडण्यांची ४,४२५ प्रकरणे मार्गी
सेवा सेतू अभियानांतर्गत नवीन वीजजोडण्या देण्याची ४,४२५ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. ग्राहकांच्या नावात बदल करण्याची ४,५१२ प्रकरणेही पूर्ण करण्यात आली आहेत. यामुळे नवीन वीजजोडणी आणि ग्राहकांच्या नोंदींशी संबंधित कामांना गती मिळाली आहे. त्याचबरोबर वीजपुरवठा खंडित होण्यासंबंधीच्या ६०,८०४ आणि वीजबिलासंदर्भातील ११,९९२ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.
वीजपुरवठा सुधारण्यासाठी २३४ रोहित्रे बदलली
वीजपुरवठ्याची गुणवत्ता आणि विश्वासार्हता वाढविण्यासाठी पुणे परिमंडलात एकूण २३४ रोहित्रे बदलण्यात आली आहेत. यामध्ये पुणे ग्रामीण मंडलातील १८१, गणेशखिंड मंडलातील ४४ आणि रास्तापेठ मंडलातील ९ रोहित्रांचा समावेश आहे.
ग्राहकांना अधिक सुलभ आणि तत्पर सेवा उपलब्ध करून देणे, प्रलंबित कामे मार्गी लावणे, वीजपुरवठ्याशी संबंधित तक्रारींचे वेळेत निराकरण करणे आणि सौरऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन देणे, हा सेवा सेतू अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.







