बीआरटी रेलिंग आणि दुभाजकांच्या स्वच्छतेसाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर; रस्ते सुरक्षिततेवर भर
काशिनाथ शिंदे
पिंपरी: पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची बचत करतानाच शहरातील रस्ते सुरक्षित ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शहरातील बीआरटी मार्गांवरील लोखंडी रेलिंग आणि रस्त्यांच्या दुभाजकांची स्वच्छता करण्यासाठी महापालिकेच्या मैलाशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर केला जात आहे. पर्यावरण विभागाच्या टँकरद्वारे हे काम करण्यात येत असून, या स्वच्छतेसाठी नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
स्वच्छतेमागे केवळ सुशोभीकरण नव्हे, तर सुरक्षिततेचेही उद्दिष्ट!
नुकत्याच झालेल्या पावसाळ्यामुळे रस्त्यांवरील चिखल, माती आणि धुळीचे थर बीआरटी रेलिंग व दुभाजकांवर साचले आहेत. त्यामुळे रेलिंगचा रंग, दुभाजकांच्या कडा आणि त्यावरील परावर्तक पट्टे झाकले जात आहेत. परिणामी, वाहनचालकांना हे अडथळे स्पष्टपणे दिसण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.
या पार्श्वभूमीवर रेलिंग आणि दुभाजकांची स्वच्छता करणे हे केवळ शहराच्या सौंदर्यात भर घालणारे काम नसून, रस्ते सुरक्षिततेच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. अलीकडेच बीआरटी रेलिंगला स्कूल बसची धडक बसल्याची घटना घडली होती. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी रेलिंगची दृश्यता कायम ठेवणे आणि संभाव्य धोकादायक ठिकाणांची स्वच्छता करणे आवश्यक असल्याचे महापालिकेने अधोरेखित केले आहे.
‘पुणे ग्रँड टूर-२०२७’च्या तयारीसह नियमित देखभालीलाही प्राधान्य
आगामी ‘पुणे ग्रँड टूर-२०२७’ सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर संबंधित बीआरटी मार्गांची स्वच्छता आणि देखभाल करण्यात येत आहे. मात्र, हे काम केवळ स्पर्धेच्या तयारीपुरते किंवा शहराच्या सुशोभीकरणापुरते मर्यादित नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
दैनंदिन प्रवास करणारे नागरिक, शालेय वाहने, सार्वजनिक वाहतूक आणि इतर वाहनचालक यांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्यांवरील संरक्षक व्यवस्था स्पष्टपणे दिसणे गरजेचे आहे. त्यामुळे रेलिंग आणि दुभाजकांची नियमित स्वच्छता व देखभाल करण्यावर भर दिला जात आहे.
प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर; जलसंवर्धनाला हातभार
पाणीटंचाईच्या परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळणे गरजेचे आहे. त्याचवेळी सार्वजनिक रस्त्यांची स्वच्छता आणि सुरक्षिततेची कामेही आवश्यक आहेत. या दोन्ही बाबींचा समतोल साधण्यासाठी महापालिका प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर करीत आहे.
नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करावा तसेच महापालिकेच्या स्वच्छता आणि रस्ते सुरक्षिततेच्या कामांना सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
— बापुसाहेब गायकवाड
सहशहर अभियंता, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका







