काशिनाथ शिंदे
किवळे : ज्येष्ठ नागरिक संघ, किवळे विकासनगर यांच्या कार्यालयात २४ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात महिलांचा लक्षणीय सहभाग होता. पारंपरिक देवीगीतांसह जुन्या हिंदी-मराठी गीतांच्या मैफलीने उपस्थित ज्येष्ठ नागरिकांना आनंदाची पर्वणी अनुभवायला मिळाली.
सौ. सुरेखा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वरांजली महिला समूहाच्या वतीने विविध पारंपरिक देवीगीते सादर करण्यात आली. ‘सावर सावर अंबाबाई’, ‘टिपरी आंबा आली’, ‘गोंधळ आई भवानी’ आणि ‘सात समुंदर’ यांसारख्या गीतांनी कार्यक्रमात रंगत आणली.
‘मेरी आवाज सुनो’चे संगीत दिग्दर्शक श्री. एम. डी. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्या हिंदी-मराठी गीतांची सुरेल मैफल रंगली. महिला आणि पुरुष ज्येष्ठ नागरिकांनी गायकांना उत्स्फूर्त दाद देत गीत-संगीताचा आणि नृत्याचा मनमुराद आनंद घेतला.
या कार्यक्रमात चंद्रकला रोकडे, ज्योती आगरकर, रुक्मिणी वाघमारे, ज्योती साठे, साधना आमटे, वनिता नाफडे, रेखा आर्य, सुषमा खापरे, सुरेखा ब्रह्मे, गोपीनाथ कुलकर्णी, निखिल, बापू देवरे, विश्वास आंबेकर, प्रमोद तांबे, अजय आमटे, शिरीष राक्षे, पृथ्वीराज आर्य, राम खापरे, बसवराज धोत्रे, शिवदास मुळे, अलका हुके, हरिश्चंद्र, किरण निकम आणि त्रिभुवन यांनी विविध हिंदी-मराठी गीते तसेच देवीगीते सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाचे निवेदन श्री. विश्वास आंबेकर यांनी केले. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व मार्गदर्शक श्री. नानासाहेब डोईफोडे आणि सचिव श्री. पंढरीनाथ सानप यांचे कार्यक्रमाला मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी किवळे-रावेतचे नगरसेवक श्री. धर्मपाल तंतरपाळे, सौ. ऐश्वर्या राजेंद्र तरस, श्री. बापू कातळे, श्री. निलेश तरस आणि श्री. राजेंद्र तरस उपस्थित होते. सर्वांच्या सहभागामुळे कोजागिरी पौर्णिमेचा सोहळा आनंददायी वातावरणात पार पडला.







