वय २१ वर्षे असल्याचे भासवण्यासाठी आधारकार्ड अन् शाळा सोडल्याच्या दाखल्याचा वापर केल्याचा आरोप
काशिनाथ शिंदे
आळंदी: विवाहासाठी कायदेशीर वय पूर्ण झाल्याचे भासवून बनावट कागदपत्रांच्या आधारे विवाह केल्याच्या आरोपावरून आळंदी पोलिसांनी १९ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आधारकार्ड आणि शाळा सोडल्याचा दाखला बनावट तयार करून त्यांचा विवाहासाठी वापर केल्याचे मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
सौरभ जोतीराम चव्हाण (वय १९ वर्षे ५ महिने, रा. नातेपुते, ता. माळशिरस, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संजय दादा पाटील (वय ४६, व्यवसाय शेती, रा. पिरळे, ता. माळशिरस, जि. सोलापूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
राजदीप मंगल कार्यालयात विवाह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ जून २०२६ रोजी दुपारी दोनच्या सुमारास आळंदी येथील राजदीप मंगल कार्यालयात हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीचा विश्वास संपादन करून स्वतःचे वय २१ वर्षे पूर्ण असल्याचे दर्शविणारे आधारकार्ड आणि शाळा सोडल्याचा दाखला बनावट तयार केला. ही कागदपत्रे खरी असल्याचे भासवून त्यांचा विवाहासाठी वापर केला आणि विवाह केला, असे फिर्यादीत नमूद आहे. प्रत्यक्षात विवाहाच्या वेळी आरोपीचे वय १९ वर्षे ५ महिने होते, असा दावा फिर्यादीने केला आहे.
आळंदी पोलिसांत गुन्हा दाखल
या प्रकरणी २४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ७.४४ वाजता आळंदी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३३६(२), ३३६(३), ३४०(२) आणि ३१८(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिरी गोसावी करीत आहेत.
टीप : प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होईल.







