पिंपरी: अमली पदार्थ तस्करांना पकडण्यासाठी सुरू असलेल्या कारवाईदरम्यान पळून जाणाऱ्या आरोपीचा पाठलाग करताना गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी जावेद बागसिराज यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी (दि. २५ ऑक्टोबर) रात्री उशिरा पिंपरीतील संत तुकारामनगर परिसरात घडली. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवड पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संत तुकारामनगर परिसरात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी काही तस्कर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर अमली पदार्थविरोधी पथकाने सापळा रचला होता. या कारवाईदरम्यान पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले. मात्र, दुसरा आरोपी पळून जाऊ लागल्याने पोलीस कर्मचारी जावेद बागसिराज यांनी त्याचा पाठलाग सुरू केला.
पाठलाग सुरू असतानाच बागसिराज यांच्या छातीत अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या आणि ते खाली कोसळले. सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांचा मृत्यू झाला.
अमली पदार्थांच्या तस्करीविरोधातील कारवाईदरम्यान कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने पोलीस दलातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने सहकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जावेद बागसिराज यांच्या निधनाने पिंपरी-चिंचवड पोलीस दलाने एक सहकारी गमावला असून, या घटनेने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.







