काशिनाथ शिंदे
पिंपरी-चिंचवड : दिव्यांग कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या कलात्मक क्षमतेला प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका दिव्यांग भवन फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात हा कार्यक्रम रंगणार आहे.
दिव्यांग भवन फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली DBF कला व सांस्कृतिक मंच, स्नेह रिसॉर्ट आणि रॉयल टच यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला, संगीत आणि सांस्कृतिक परंपरांचे दर्शन या कार्यक्रमातून घडविण्यात येणार आहे. दिव्यांग कलाकारांना आपल्या कलागुणांचे सादरीकरण करण्याची संधी मिळावी, त्यांना सांस्कृतिक क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या आत्मविश्वासात वाढ व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
दिव्यांग कलाकारांना मिळणार हक्काचे व्यासपीठ
दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण सक्षमीकरणासोबतच त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी महानगरपालिकेच्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. दिव्यांग कलाकारांना कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या कौशल्यविकासाला चालना देणे आणि त्यांना स्वावलंबनाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित करणे, या उद्देशाने ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हा सांस्कृतिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमामुळे दिव्यांग कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार असून, त्यांच्या कलागुणांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
या उपक्रमाला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी (आयएएस), अतिरिक्त आयुक्त विक्रांत बागाडे, समाज विकास विभागाच्या उपायुक्त ममता शिंदे, दिव्यांग कक्षाच्या सहायक आयुक्त निवेदिता धायगुडे, दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख (निवृत्त आयएएस) आणि कार्यकारी संचालक अजय चारठाणकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे.
तसेच, स्नेह रिसॉर्टचे संस्थापक अमोल चौधरी आणि रॉयल टचचे संस्थापक दीपक माने यांचे या सांस्कृतिक उपक्रमासाठी सहकार्य लाभले आहे.
दिव्यांग व्यक्तींना समान संधी, सन्मान आणि स्वावलंबन मिळवून देण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने दिव्यांग भवन फाउंडेशनचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.







