लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पिंपरी-चिंचवडमध्ये आगीचा भडका; ७६ घटनांनी अग्निशमन दलाची धावपळ!

४२ अग्निशमन वाहने आणि २५० जवानांची शहरभर सज्जता; तत्पर प्रतिसादामुळे जीवितहानी टळली

काशिनाथ शिंदे

पिंपरी : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांच्या आतषबाजीसह विविध कारणांमुळे पिंपरी-चिंचवड शहरात आगीच्या तब्बल ७६ घटनांची नोंद झाली. निवासी इमारती, घरे, दुकाने, मोकळी मैदाने, वाहने आणि झाडांना आग लागण्याच्या घटनांनी अग्निशमन विभागाची दिवसभर धावपळ उडाली. मात्र, अग्निशमन जवानांच्या तत्परतेमुळे सर्व घटनांवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. विशेष म्हणजे, या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही.

२० इमारतींमध्ये आग; ५० ठिकाणी गवत, कचरा जळाला

नोंदविण्यात आलेल्या ७६ घटनांपैकी २० घटना फ्लॅट, घरे आणि दुकानांना आग लागण्याच्या होत्या. तर ५० ठिकाणी मोकळ्या मैदानातील गवत, कचरा आणि झाडांना आग लागली. उर्वरित सहा घटनांमध्ये फ्लेक्स, कंपाउंड, वाहने आणि टॉवरला आग लागल्याची नोंद करण्यात आली.

स्पाईन रोडवरील सेक्टर १२ मधील निवासी इमारतीच्या अकराव्या मजल्यावरील फ्लॅट, जाधववाडी-चिखली येथील आठव्या मजल्यावरील फ्लॅट आणि मोशीतील मंत्रा मोमेंट सोसायटी परिसरात आगीच्या घटना घडल्या.

मोरवाडी येथे चारचाकी वाहनाला, तर काळेवाडीतील बारणे कॉर्नर, थेरगाव येथे दोन दुचाकींना आग लागली. याशिवाय भोसरीतील लांडेवाडी, थरमॅक्स चौक-चिखली रस्ता, पिंपरी चौकातील गोकुळ हॉटेल परिसर, चिंचवडमधील एम्पायर इस्टेट परिसरातील नदीपात्र, मोई-निघोजे रस्ता, मोशी कब्रस्तान परिसर, निगडी प्राधिकरणातील गणेश तलाव, चिंतामणी चौक, चिंचवड चौक आणि चिंचोळे नगर परिसरातही आगीच्या घटना घडल्या.

नेहरूनगरमधील मयूर पॅनोरमा सोसायटी परिसरात गवताला, पिंपळे सौदागर येथील प्लॅनेट मिलेनियम सोसायटी परिसरात नारळाच्या झाडाला, तर पिंपळे गुरवमधील भैरवनाथ नगर परिसरात कचऱ्याला आग लागली. प्रत्येक ठिकाणी अग्निशमन जवानांनी तातडीने धाव घेत आगीचा प्रसार रोखला.

४२ अग्निशमन वाहने, २५० अधिकारी-कर्मचारी तैनात

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आगीच्या संभाव्य घटना लक्षात घेऊन महापालिकेच्या अग्निशमन विभागाने विशेष पूर्वतयारी केली होती. शहरातील नियमित १० अग्निशमन केंद्रांव्यतिरिक्त आणखी १२ महत्त्वाच्या ठिकाणी अग्निशमन वाहने आणि आवश्यक मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते.

See also  मार्चअखेर राज्यातील सर्व कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठा!

या विशेष व्यवस्थेंतर्गत शहरभर ४२ अग्निशमन वाहने आणि २५० अधिकारी-कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले होते. त्यामुळे आगीची माहिती मिळताच जवळचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचू शकले. या नियोजनामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

नागरिकांनी अग्निसुरक्षेचे नियम पाळावेत

निवासी इमारती, व्यावसायिक संकुले आणि औद्योगिक आस्थापनांमध्ये अग्निसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन विभागाच्या १०१ किंवा ७०३०१०८९९१ या मुख्य अग्निशमन केंद्राच्या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका म्हणाले, “दिवाळीच्या काळात नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेऊन महापालिकेच्या वतीने विशेष नियोजन करण्यात आले होते. शहरातील १० अग्निशमन केंद्रांसह १२ महत्त्वाच्या ठिकाणी अग्निशमन वाहने व मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे आगीच्या घटनांवर वेळीच नियंत्रण मिळविता आले. नागरिकांची सुरक्षितता ही महापालिकेची सर्वोच्च प्राथमिकता आहे.”

व्यंकटेश दुर्वास, उपआयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका म्हणाले, “दिवाळीच्या कालावधीत आगीच्या घटनांना तातडीने प्रतिसाद देता यावा, यासाठी अग्निशमन विभागाची संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. ४२ अग्निशमन वाहने आणि २५० अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शहरभर कार्यवाही करण्यात आली. जवानांच्या समन्वयपूर्ण आणि तत्पर कामगिरीमुळे सर्व घटनांमध्ये जीवितहानी टाळणे शक्य झाले. नागरिकांनीही अग्निसुरक्षेच्या नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.”

  • Related Posts

    मार्केटयार्डमध्ये एमडीचा मोठा साठा जप्त; तिघे पोलिसांच्या ताब्यात

    ४.९२ लाखांचे २४.६३ ग्रॅम मॅफेड्रॉन हस्तगत; रिक्षा, मोबाइल आणि रोख रकमेसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपुणे : गुलटेकडी येथील मार्केटयार्ड परिसरात अमली…

    भारतीय महिलांमध्ये रुजलेली मूल्ये अतुलनीय; त्यांच्या श्रद्धेला वंदन – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

    मोशीतील इंद्रायणी नदीच्या तीरावर विश्व श्रीराम सेनेच्या छटपूजा महोत्सवात भक्तीचा जनसागर; १५ हजार भाविकांची उपस्थिती काशिनाथ शिंदे Read moreमुंबई : मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकी संपन्नपिंपरी : भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये सूर्यनारायणाच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    मार्केटयार्डमध्ये एमडीचा मोठा साठा जप्त; तिघे पोलिसांच्या ताब्यात

    मार्केटयार्डमध्ये एमडीचा मोठा साठा जप्त; तिघे पोलिसांच्या ताब्यात

    भारतीय महिलांमध्ये रुजलेली मूल्ये अतुलनीय; त्यांच्या श्रद्धेला वंदन – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

    भारतीय महिलांमध्ये रुजलेली मूल्ये अतुलनीय; त्यांच्या श्रद्धेला वंदन – स्वामी गोविंददेव गिरी महाराज

    लहूजी वस्तादांच्या कार्यातून फुले, फडके, टिळकांना मिळाले प्रेरणाबळ!

    लहूजी वस्तादांच्या कार्यातून फुले, फडके, टिळकांना मिळाले प्रेरणाबळ!

    शासकीय योजनांचा लाभ हवा असेल तर शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि फार्मर आयडी तातडीने पूर्ण करा!

    शासकीय योजनांचा लाभ हवा असेल तर शेतकऱ्यांनी ई-केवायसी आणि फार्मर आयडी तातडीने पूर्ण करा!

    क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

    क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन

    संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत ‘हरित सेतू’चा डंका! पिंपरी-चिंचवडच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे जागतिक स्तरावर कौतुक

    संयुक्त राष्ट्रांच्या हवामान परिषदेत ‘हरित सेतू’चा डंका! पिंपरी-चिंचवडच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे जागतिक स्तरावर कौतुक