टिळकनगरमध्ये मध्यरात्री टोळक्याची दहशत; नवाब पठाण यांचा मृत्यू, तिघे जखमी; दोघांना अटक, आठ जणांविरुद्ध गुन्हा
काशिनाथ शिंदे
श्रीरामपूर : दिवाळीच्या फटाक्यांचे अवघे ८०० रुपये देण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले. श्रीरामपूर येथील टिळकनगर परिसरात रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तलवार, कुऱ्हाड आणि चाकू घेऊन आलेल्या टोळक्याने एका कुटुंबावर हल्ला चढवला. यावेळी भरधाव कार अंगावर घालून शफी नवाब पठाण यांची हत्या करण्यात आली. या घटनेत भारत कैलास खंडागळे, रियाज शेख यांच्यासह अन्य एक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोईनुद्दीन पठाण यांनी दिवाळीनिमित्त कामगार चौकात फटाक्यांचे दुकान थाटले होते. रात्री साडेआठच्या सुमारास काही जण स्विफ्ट डिझायर कारमधून दुकानावर आले. त्यांनी ८०० रुपयांचे फटाके खरेदी केले. मात्र, पैसे मागितल्यानंतर त्यांनी पैसे देण्यास नकार देत मोईनुद्दीन यांना धमकी दिल्याचा आरोप आहे. याच किरकोळ आर्थिक वादाचा राग मनात धरून आरोपी रात्री पुन्हा त्यांच्या घरासमोर पोहोचले.
सुरुवातीला तलवारीने वार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर तलवार, कुऱ्हाड आणि चाकू घेऊन आलेल्या टोळक्याने परिसरात दहशत निर्माण केली. या हल्ल्यादरम्यान आरोपींनी मोईनुद्दीन यांचे चुलते शफी पठाण यांच्या अंगावर भरधाव कार घातली. एवढ्यावरच न थांबता कार मागे घेऊन पुन्हा त्यांच्या अंगावर घातल्याचा आरोप आहे. शफी पठाण यांना वाचवण्यासाठी धावलेल्या इतरांनाही कारने धडक दिली. यामध्ये भारत खंडागळे, रियाज शेख यांच्यासह अन्य एक जण जखमी झाले.
दरम्यान, घरासमोर उभ्या असलेल्या रिक्षाला धडक दिल्यानंतर आरोपींची कार पलटी झाली. घटनेनंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी शफी नवाब पठाण यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अक्षय गुंजेकर आणि अमित कोळगे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.
अवघ्या ८०० रुपयांच्या वादातून थेट शस्त्रांनी हल्ला आणि कार अंगावर घालून झालेल्या या हत्येने श्रीरामपूर हादरले आहे. उर्वरित आरोपींच्या अटकेसह या हल्ल्यामागील नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.







