पर्वती पोलिसांची धडाकेबाज कारवाई; महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणारा सराईत आरोपी अटकेत, गुन्ह्यातील पल्सर दुचाकी जप्त
काशिनाथ शिंदे
पुणे : पुणे शहरात पायी जाणाऱ्या महिलांना लक्ष्य करून भरधाव वेगाने दुचाकी आडवी लावत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या सराईत इराणी टोळीला मोठा दणका बसला आहे. पर्वती पोलिसांच्या तपास पथकाने कुख्यात चेनस्नॅचर हैदर सलिम इराणी (वय ३०, रा. कदमवाक वस्ती, पुणे) याला अटक केली आहे. त्याच्या अटकेमुळे पुणे शहर आणि परिसरातील तब्बल १० जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावून पोबारा
पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिर्यादी यांच्या आई पायी जात असताना काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अचानक त्यांच्या समोर दुचाकी आडवी लावली. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला होता. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा माग
या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तपास पथकाला आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, राकेश सुर्वे आणि किशोर वळे यांनी परिसरातील शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हैदर सलिम इराणी याची ओळख निष्पन्न झाली.
गुन्हा केल्यानंतर हैदर आणि त्याचा साथीदार बिदर (कर्नाटक) तसेच अनंतपूर (आंध्र प्रदेश) येथे पसार झाले होते.
रायपूरला पळण्याच्या तयारीत असतानाच अटक
हैदर इराणी पुन्हा पुण्यात आला असून रेल्वेने रायपूरला पळून जाण्याच्या तयारीत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तपास पथकाने तातडीने सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरण्यात आलेली काळ्या रंगाची बजाज पल्सर एनएस दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे.
पुणे शहर आणि परिसरातील १० गुन्हे उघड
आरोपीकडे केलेल्या सखोल चौकशीत पुणे शहर आणि ग्रामीण भागातील एकूण १० जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामुळे शहरातील सोनसाखळी चोरीच्या घटनांच्या तपासाला महत्त्वाचे यश मिळाले आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कामगिरी
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ २) मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त गजानन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोकुळ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सहायक पोलीस निरीक्षक विशाल राऊत, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, राकेश सुर्वे, किशोर वळे, सूर्या जाधव, प्रसाद पोतदार, शाहरुख शेख, अमोल दबडे, अमित चिव्हे, मारुती तांदळे, मनोज बनसोड, स्वप्निल घुगे, रणजित घाडगे आणि गणेश तरंगे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.







