स्वरांजली संगीतमय नजराणा आणि स्वरसाधना यांचा संयुक्त उपक्रम; जुन्या हिंदी-मराठी गीतांनी रसिक मंत्रमुग्ध
काशिनाथ शिंदे
आकुर्डी : येथील वर्ल्ड ऑफ मदर महिला व्यापारी संकुलात रविवार, दि. ८ नोव्हेंबर २०२६ रोजी दिवाळी पहाट २०२६ हा संगीतमय कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. स्वरांजली संगीतमय नजराणा आणि स्वरसाधना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात जुन्या हिंदी आणि मराठी गीतांची सुरेल मैफल रंगली. गीतांच्या सुमधुर स्वरांनी उपस्थित रसिकांची पहाट आनंदमय झाली.
श्री. एम. डी. चौधरी आणि श्री. उदय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची सुरेल सुरुवात झाली. जुन्या हिंदी-मराठी अजरामर गीतांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली. ‘हम और तुम आये समा’, ‘मानसीचा चित्रकार’, ‘तू प्यार का सागर है’, ‘तुझे सूरज कहूँ या चंदा’, ‘जीवन से भरी तेरी आँखें’, ‘ठंडी हवाये’, ‘दिल हुं हुं करे’, ‘ये परदा हटा दो’ यांसह विविध लोकप्रिय गीतांनी रसिकांना जुन्या आठवणींमध्ये रमवले.
या कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते एम. डी. चौधरी यांचे माऊथ ऑर्गन वादन. त्यांच्या वादनातील ‘चोरीचा मामला मामा ह्यो थांबला’ या सादरीकरणाला रसिकांची विशेष दाद मिळाली.
कार्यक्रमात उदय काळे, डॉ. संजीव कुमार लोंढे, चिंतामणी खाडे, संभाजी ढमढेरे, निलेश आहेर, स्नेहा तुरसे, सदानंद बोगम, विनोद कुलकर्णी, प्रकाश येरेकर, भाग्यश्री शार्दुल आणि शिरीष राक्षे यांनी आपल्या बहारदार आवाजाने गाण्यांची मैफल अधिकच रंगतदार केली.
कार्यक्रमाचे प्रभावी निवेदन मानसी कुलकर्णी यांनी केले. सुरेल गीतांचा नजराणा, कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग आणि रसिकांचा प्रतिसाद यामुळे वर्ल्ड ऑफ मदरमधील दिवाळी पहाट अविस्मरणीय ठरली.







