स्वरांजली संगीत समूहाच्या कलाकारांनी सादर केला सुरेल नजराणा; ज्येष्ठ नागरिकांनी घेतला संगीत मेजवानीचा आनंद
काशिनाथ शिंदे
किवळे : किवळे विकासनगर येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने मंगळवारी ज्येष्ठ नागरिकांसाठी संगीतमय दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. स्वरांजली संगीत समूहाच्या कलाकारांनी सादर केलेल्या हिंदी आणि मराठी गीतांच्या सुरेल मैफिलीने उपस्थितांची मने जिंकली. उत्साह, आनंद आणि संगीताच्या सुरांनी संपूर्ण परिसरात दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला.
संगीत दिग्दर्शक एम. डी. चौधरी आणि निर्माता व संकल्पनाकार रवी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. ‘मेरी आवाज सुनो’ आणि स्वरांजली संगीत समूहाच्या वतीने सौ. सुरेखा वाघ, चंद्रकला रोकडे आणि सौ. रुक्मिणी वाघमारे यांनी बहारदार गीते सादर केली. ‘कमानी दरवाजाला रुक्मिणीचे दोन्ही हात’, ‘खरं सांगा ना विठ्ठला, जनी संग काय नातं’ तसेच रुक्मिणी वाघमारे यांनी सादर केलेले ‘कुंकू घ्या कुणी काळ मनी’ या गीतांना विशेष दाद मिळाली.
कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन नानासाहेब डोईफोडे आणि पंढरीनाथ सानप यांच्या हस्ते करण्यात आले. रवी कुलकर्णी यांनी सादर केलेल्या ‘गाये गणपती’ या भक्तिगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘देवाचे हे दारी’, ‘दिवानो से मत पूछो’, ‘तुमको मेरे दिल ने’, ‘फुलला रे क्षण माझे’, ‘इना मीना डिका’, ‘ज्योत से ज्योत’, ‘बेकरार करके’, ‘गार डोंगराची हवा’, ‘ज्योती कलश छलके’, ‘गोरी तेरा गाव’, ‘वादा करो साजना’, ‘ओ मेरे दिल के चैन’, ‘ये रेशमी जुल्फें’, ‘कजरा मोहब्बतवाला’, ‘आकाशी झेप घे रे’ आणि ‘मेरे झोपडी में राम आयेगा’ अशा एकापेक्षा एक लोकप्रिय हिंदी-मराठी गीतांनी मैफल रंगत गेली.
संगीत दिग्दर्शक एम. डी. चौधरी यांनी मुखवाद्यावर सोलवा साल या चित्रपटातील ‘है अपना दिल तो आवारा’ हे गाणे वाजवून कार्यक्रमात विशेष रंगत आणली. त्यांच्या वादनाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या संगीत मैफिलीत गफूरभाई शेख, शिवदास मुळे, पृथ्वीराज आर्य, बापू देवरे, शिरीष राक्षे, सुरेखा ब्रह्मे, प्रतिभा भाले, विश्वास आंबेकर, राम खापरे, निखिल, अशोक गाढवे, पंढरीनाथ सानप, अलका हुके, हरिचंद्र, गोपीनाथ कुलकर्णी, बसवराज धोत्रे, अजय आमटे, वनिता नाफडे, सुप्रिया, विजय उपासने, किरण निकम आणि माटेश्वरी यांनी विविध हिंदी-मराठी गीते सादर करून रसिकांची वाहवा मिळवली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यकारिणी सदस्य मारुती भराटे, इलियास खान, मच्छिंद्र कदम, माणिक हेकड, गफूरभाई शेख, दिलीप रोकडे, दशरथ वाघमारे, विश्वास आंबेकर, बसवराज धोत्रे, लक्ष्मण सुपे, ज्ञानोबा पाटोळे, सुरेखा ब्रह्मे, रवींद्र कदम आणि कल्पिता पळसुले यांनी विशेष सहकार्य केले.
यावेळी किवळे विकासनगरचे नगरसेवक निलेश तरस, राजेंद्र तरस, ऐश्वर्या राजेंद्र तरस, धर्मपाल तंतरपाळे आणि बापू कातळे यांची उपस्थिती होती. ज्येष्ठ नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि कलाकारांच्या सुरेल सादरीकरणामुळे ही दिवाळी पहाट संस्मरणीय ठरली.







