विविध क्षेत्रांतील मान्यवर महिला मांडणार अनुभव; कौटुंबिक आणि व्यावसायिक आयुष्यात समतोल राखण्यावर होणार विचारमंथन
काशिनाथ शिंदे
पिंपरी : महिलांना कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळताना येणारी आव्हाने, त्यांचा संघर्ष आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल राखण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न यावर विचारमंथन करण्यासाठी ‘मी… माझा प्रवास, अनेक भूमिका आणि सुवर्णमध्य’ या चर्चासत्राचे आयोजन मंगळवारी (दि. १३ ऑक्टोबर) करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या (पीसीसीओई) अंतर्गत तक्रार समितीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १०.३० वाजता महाविद्यालयातील यांत्रिकी विभागाच्या चर्चासत्र सभागृहात या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
या चर्चासत्रात सिटी प्राइड स्कूलच्या प्राचार्य डॉ. कांचन देशपांडे, कायदा सल्लागार ॲड. परिक्रमा खोत, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. क्षमा उपलेंचवार आणि न्यू एज फायर फायटिंग कंपनीचे संचालक सुजल शाह सहभागी होणार आहेत. विविध क्षेत्रांतील अनुभवांच्या माध्यमातून महिला आपला व्यावसायिक प्रवास, त्यातील आव्हाने आणि दैनंदिन जबाबदाऱ्यांचे व्यवस्थापन याविषयी विचार मांडणार आहेत.
पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे आणि अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, उपसंचालक निळकंठ चोपडे, अंतर्गत तक्रार समितीच्या उपाध्यक्ष सहायक प्राध्यापक वृषाली भालेराव आणि अधिष्ठाता डॉ. एस. यू. भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
महिलांसाठी खुले व्यासपीठ
महिलांना कौटुंबिक आणि व्यावसायिक जबाबदाऱ्या सांभाळताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिलांचे अनुभव, त्यांचा व्यावसायिक प्रवास, संघर्ष आणि दैनंदिन जबाबदाऱ्यांचे प्रभावी व्यवस्थापन करण्याचे व्यावहारिक उपाय यांची देवाणघेवाण व्हावी, हा चर्चासत्राचा मुख्य उद्देश आहे. महिलांना आपले विचार मांडण्यासाठी आणि एकमेकींच्या अनुभवांतून शिकण्यासाठी खुले व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे अंतर्गत तक्रार समितीच्या उपाध्यक्ष सहायक प्राध्यापक वृषाली भालेराव यांनी सांगितले.







