पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चार रुग्णालयांत शिबिरांचे आयोजन; १५ महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग
काशिनाथ शिंदे
पिंपरी: राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिन आणि ‘सेवा संकल्प अभियान’ यांच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने शहरातील चार रुग्णालयांमध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. या शिबिरांमध्ये आतापर्यंत एकूण १९६ नागरिकांनी रक्तदान केले असून, त्यामध्ये १५ महिलांचा समावेश आहे. यावेळी उपस्थितांनी सामूहिक रक्तदानाची शपथ घेत सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प केला.
आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे आणि अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही शिबिरे घेण्यात आली. पिंपरी येथील जिजामाता रुग्णालय, सांगवी येथील स्व. इंदिरा गांधी रुग्णालय, नवीन थेरगाव रुग्णालय आणि आकुर्डी येथील ह. भ. प. प्रभाकर मल्हारराव कुटे स्मृती रुग्णालय येथे नागरिकांनी रक्तदान करून या उपक्रमाला प्रतिसाद दिला.
शिबिरांच्या यशस्वितेसाठी संबंधित रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. जिजामाता रुग्णालयातील डॉ. अल्वी आणि डॉ. शीतल शिंदे, सांगवी रुग्णालयाच्या ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. तृप्ती सांगळे आणि नोडल अधिकारी डॉ. वैशाली भामरे, नवीन थेरगाव रुग्णालयातील डॉ. संजय सोनेकर आणि डॉ. शंकर मोसलगी, तसेच आकुर्डी रुग्णालयाचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर आणि डॉ. हरीश शेंडे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
या सर्व शिबिरांसाठी वाय.सी.एम. रुग्णालयाच्या रक्तपेढीच्या प्रभारी डॉ. नीता घाडगे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. गणेश लोंढे आणि त्यांच्या पथकाने सहकार्य केले. संबंधित रुग्णालयांतील वैद्यकीय अधिकारी, मेट्रन, कक्षप्रमुख, परिचारिका, सार्वजनिक आरोग्य परिचारिका आणि इतर कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कामकाज सांभाळले.
रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी
रक्तदान हे जीवनदान असून, अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणाऱ्या आणि विविध आजारांमुळे रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी रक्तदात्यांचे योगदान महत्त्वाचे ठरते. ‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून नागरिकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. महापालिकेच्या वतीने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने नियमितपणे मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. नागरिकांनी अशा उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उपलब्ध आरोग्यसेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
चौकट : रक्तदानासाठी नागरिकांना आवाहन
“रक्तदान हे मानवतेची सेवा करण्याचे महत्त्वपूर्ण माध्यम आहे. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होण्यासाठी नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नियमितपणे मोफत आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येते. नागरिकांनी या शिबिरांमध्ये सहभागी होऊन त्यांचा लाभ घ्यावा.”
— डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका







