प्रख्यात वास्तुविशारद वासवी मुळे यांचे मार्गदर्शन; एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईनमध्ये इंटिरिअर डिझाईनच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत
काशिनाथ शिंदे
पिंपरी, पुणे : इंटिरिअर डिझायनर म्हणून काम करताना पारंपरिक कल्पनांच्या पलीकडे जाऊन सर्जनशील दृष्टिकोन विकसित करणे आणि व्यावसायिक कौशल्य वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. या क्षेत्रात नव्या पिढीतील होतकरू युवकांना आपल्या कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी मुबलक संधी उपलब्ध आहेत. अनेक डिझायनर एकत्रितपणे महत्त्वपूर्ण योगदान देतात, तेव्हाच उत्कृष्ट कलाकृती साकार होते, असे मार्गदर्शन प्रख्यात वास्तुविशारद वासवी मुळे यांनी केले.
पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर अँड डिझाईन, आकुर्डी येथे प्रथम वर्षाच्या पदविका इन इंटिरिअर डिझाईन अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात वासवी मुळे बोलत होत्या. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता सूर्यवंशी, लक्ष्मण तोरगले आदी उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. स्मिता सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण, अभ्यासक्रमाची रचना, शैक्षणिक अपेक्षा आणि अध्ययनाच्या विविध संधी यांची माहिती दिली. तसेच इंटिरिअर डिझाईन या क्षेत्रातील व्यापक संधींची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांनी कुतूहल, कल्पनाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या बळावर या क्षेत्रात आपले करिअर घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी वास्तुविशारद वासवी मुळे यांनी आपल्या व्यावसायिक प्रवासातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. सर्जनशीलता, सातत्यपूर्ण प्रयत्न, कौशल्यविकास आणि सहकार्य यांच्या माध्यमातून या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करता येते, याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.






