पुस्तकांसाठी पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी मॅरेथॉनमध्ये सहभाग; स्लीपर हातात घेऊन अनवाणी धावत तरुण स्पर्धकांनाही टाकले मागे
काशिनाथ शिंदे
अंबाजोगाई : मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आई कोणत्याही संकटाचा सामना करू शकते, याचा प्रत्यय बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील ४७ वर्षीय रमाबाई रणवीर यांनी दिला आहे. आपल्या मुलींच्या शिक्षणासाठी आणि त्यांना आवश्यक पुस्तके खरेदी करता यावीत, यासाठी त्यांनी चक्क मॅरेथॉन स्पर्धेत धावण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, साधी साडी आणि पायात स्लीपर घालून स्पर्धेत उतरलेल्या रमाबाईंनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तीन किलोमीटरच्या शर्यतीत प्रथम क्रमांक पटकावला.
रमाबाई एका अकॅडमीत स्वयंपाकाचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मुलींच्या शिक्षणात पैशांची अडचण येऊ नये, त्यांना हवी असलेली पुस्तके घेता यावीत, या प्रामाणिक हेतूने त्यांनी ‘अमृत दौड’ मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला.
स्पर्धेदरम्यान धावत असताना त्यांच्या पायातील स्लीपर निसटल्या. मात्र, त्यामुळे त्या थांबल्या नाहीत. हातात स्लीपर घेऊन त्यांनी अनवाणी पायांनी धावणे सुरूच ठेवले. त्यांच्या या जिद्दीपुढे वय, परिस्थिती आणि अडचणींनीही हार मानली. तरुण स्पर्धकांना मागे टाकत त्यांनी तीन किलोमीटरच्या शर्यतीत अव्वल स्थान मिळवले.
या विजयाबद्दल त्यांना तीन हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले. विशेष म्हणजे, या बक्षिसाच्या रकमेतून आपल्या मुलींसाठी पुस्तके खरेदी करण्याचा त्यांचा मानस आहे.
स्वतःच्या पायातील चप्पल निसटली, तरी मुलींच्या शिक्षणाचा मार्ग मात्र अडखळू दिला नाही, अशी प्रेरणादायी कहाणी रमाबाईंनी आपल्या कृतीतून जगासमोर ठेवली आहे. पदरात कष्ट, डोळ्यांत मुलींच्या भविष्याची स्वप्ने आणि मनात जिद्द असेल, तर कोणतेही ध्येय अशक्य नसते, हे त्यांनी सिद्ध केले. अशा कर्तृत्ववान आणि संघर्षशील आईला मनापासून सलाम! 🙏







