Oplus_131072
काशिनाथ शिंदे : किवळे
आषाढी एकादशीचे औचित्य साधत किवळे गावातील विकासनगर ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पालखी सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ नागरिकांसह महिला-पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभागी होत विठ्ठल भक्तीचा जागर केला. विठ्ठल नामाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
के-व्हिला परिसरातून पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. विकासनगर येथील विठ्ठल मंदिर ते दत्त मंदिर असा पालखीचा मार्ग निश्चित करण्यात आला होता. “विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल”, “चल गं सखे पंढरीला” अशा नामघोषांनी वातावरण दुमदुमून गेले. वारकरी परंपरेचा आनंद लुटण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
सोहळ्यात महिलांचा सहभाग विशेष आकर्षण ठरला. महिलांनी फुगड्या, रिंगण, भजन आणि भक्तिगीतांच्या माध्यमातून भक्तीभाव व्यक्त केला. तसेच एका चिमुकल्याने विठ्ठल-रुक्मिणीची वेशभूषा साकारत उपस्थितांची मने जिंकली.
या भक्तिमय सोहळ्यास नगरसेवक निलेश तरस, नगरसेविका ऐश्वर्या तरस, धर्मपाल तंतरपाळे तसेच सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र तरस यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून सहभागी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नानासाहेब डोईफोडे, सचिव पंढरीनाथ सानप, खजिनदार मारुती भराटे, कार्याध्यक्ष इलियास खान तसेच मच्छिंद्र कदम, माणिक एकाड, किसन एकाड, गफूर शेख, दिलीप रोकडे, दशरथ वाघमारे, गजानन ठाणे, लक्ष्मण सुपे, ज्ञानोबा पाटोळे, रवींद्र कदम, विलास पळसुळे, एम. डी. चौधरी, सुरेखा वाघ, सविता ब्रम्हे, कल्पिता पळसुळे आणि संघाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन होत आषाढी एकादशीचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा केला.
