काशिनाथ शिंदे: पंढरपूर
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि आरोग्यदायी व्हावा या उद्देशाने राबविण्यात आलेल्या ‘चरण सेवा’ उपक्रमातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे जिल्हा मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे अध्यक्ष तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. मानसिंग साबळे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पंढरपूर येथे विशेष सन्मान करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्र राज्याचे कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या “निर्मल वारी, चरण सेवा” उपक्रमाचा समारोप २४ जुलै रोजी पंढरपूर येथे उत्साहात पार पडला. या उपक्रमामुळे यंदाची आषाढी वारी अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरणात पार पडल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
राज्यभरातील सेवाभावी संस्था, प्रशासकीय अधिकारी आणि विविध विभागांच्या समन्वयातून हा उपक्रम यशस्वी झाला. पालखी सोहळ्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व मान्यवरांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्यामध्ये पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील पालखी मुक्कामस्थळी ‘चरण सेवा’ उपक्रमाचे प्रभावी नियोजन, उत्कृष्ट अंमलबजावणी आणि वारकऱ्यांना दिलेल्या आरोग्य सेवेसाठी डॉ. मानसिंग साबळे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या ‘निर्मल वारी’ तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या ‘चरण सेवा’ उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीत योगदान देणाऱ्या सर्व सेवाभावी संस्था, प्रशासकीय अधिकारी आणि मान्यवरांचे कौतुक करत त्यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव केला.
सन्मान स्वीकारल्यानंतर भावना व्यक्त करताना डॉ. मानसिंग साबळे म्हणाले, “वारकऱ्यांच्या सेवेसाठी ‘चरण सेवा’ उपक्रमात योगदान देण्याची संधी मिळणे हे माझ्यासाठी मोठे भाग्य आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेला हा सन्मान समाजसेवेची जबाबदारी अधिक वाढवणारा असून भविष्यातही वारकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या सेवेसाठी अधिक जोमाने कार्य करत राहीन.”







