काशिनाथ शिंदे : कोल्हापूर
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (ज्ञानदेव यशवंतराव पाटील) यांचे मंगळवारी कोल्हापुरात वृद्धापकाळाने वयाच्या ९०व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रावर शोककळा पसरली असून शिक्षण क्षेत्रातील एक युग संपल्याची भावना व्यक्त होत आहे.
शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षण, समाजकारण आणि सार्वजनिक जीवनात भरीव योगदान दिले. विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, या ध्येयाने त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या शैक्षणिक संस्था आज देश-विदेशात गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक आणि शैक्षणिक योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ या प्रतिष्ठेच्या नागरी सन्मानाने गौरविले होते.
२ ऑक्टोबर १९३५ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील अंबाप येथे जन्मलेल्या डॉ. पाटील यांनी डी. वाय. पाटील ग्रुप’ची स्थापना करून देशभरात १८२ हून अधिक शैक्षणिक संस्था, आंतरराष्ट्रीय शाळा आणि सात विद्यापीठांचे भव्य शैक्षणिक जाळे उभे केले. लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचे कार्य त्यांच्या संस्थांमधून घडले.
राजकीय क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. महाराष्ट्रात आमदार व मंत्री म्हणून काम केल्यानंतर त्यांनी बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली.
डॉ. डी. वाय. पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सतेज (बंटी) पाटील यांचे वडील होते. त्यांच्या निधनानंतर विविध राजकीय पक्षांचे नेते, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि असंख्य माजी विद्यार्थ्यांनी शोक व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
“शिक्षणाचा वटवृक्ष हरपला; लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारा एक महान शिक्षणमहर्षी काळाच्या पडद्याआड गेला,” अशा शब्दांत राज्यभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.







